इंडिया’च्या खासदारांकडून जोरदार स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने त्यासंबंधी अधिकृत पत्र जारी केल्यानंतर राहुल गांधी सोमवारी पावसाळी अधिवेशात उपस्थित राहण्यासाठी संसदेत पोहोचले. संसद भवनाच्या आवारात राहुल गांधी आपल्या कारमधून खाली उतरताच तेथे उपस्थित असलेल्या काँग्रेस आणि इतर काही मित्रपक्षांच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी ‘राहुल गांधी जिंदाबाद’ अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच ‘इंडिया’च्या खासदारांनी त्यांचे स्वागत केले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, पक्षाचे राज्यसभेतील उपनेते प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, शिवसेनेचे (यूबीटी) संजय राऊत, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे (आरएसपी) एनके प्रेमचंद्रन आणि ‘इंडिया’मधील बरेच खासदार त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. संसद भवनात पोहोचताच प्रथम महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या कामकाजात भाग घेतला.
तब्बल चार महिन्यांनंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ऑगस्टच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत 24 मार्चच्या अधिसूचनेची अंमलबजावणी पुढील न्यायिक निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ट्विटर बायोमध्ये बदल
खासदारकी बहाल केल्याचे पत्र प्राप्त होताच राहुल गांधी यांनी आपला ट्विटर बायो बदलला. यामध्ये त्यांनी ‘खासदार’ असा उल्लेख केला आहे. सदस्यत्व गमावल्यानंतर त्यांनी स्वत:चा ‘डिस्क्वालिफाईड एमपी’ (अयोग्य खासदार) असा उल्लेख केला होता. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर लोकसभा सचिवालयाकडून सोमवारी अधिसूचना जारी कऊन त्यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी प्राप्त झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेस मुख्यालयात याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना मिठाई भरवल्यानंतर अन्य नेत्यांनीही तोंड गोड केले. याचदरम्यान, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लोकसभेतील त्यांच्या पुनरागमनाचे स्वागत करत देशातील जनतेच्या खऱ्या प्रश्नांचा आवाज पुन्हा एकदा संसदेत गुंजेल, असे भाष्य केले आहे.
राहुल गांधी यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. भारतातील लोकांसाठी आणि विशेषत: वायनाडच्या लोकांसाठी हा दिलासा आहे. भाजप आणि मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात जो काही वेळ शिल्लक आहे त्याचा वापर कऊन विरोधी नेत्यांना लक्ष्य कऊन लोकशाहीला बदनाम करण्याऐवजी खऱ्या कारभारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे खर्गे म्हणाले. राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्याने लोकशाही वाचवण्यासाठी आणि सार्वजनिक समस्या मांडण्याच्या लढ्याला नवे बळ मिळेल. उज्ज्वल भविष्याचा पाया रचून भारताला सक्षम बनवण्याच्या दिशेने आता काँग्रेस कार्यकर्ते एकत्रितपणे पुढे जातील, असेही ते पुढे म्हणाले.









