खासदारकी मिळाल्यानंतर प्रथमच केरळ-तामिळनाडू दौऱ्यावर : वायनाड मतदारसंघात जोरदार स्वागत
वृत्तसंस्था/ वायनाड
काँग्रेस नेते राहुल गांधी 12 आणि 13 ऑगस्ट रोजी आपला संसदीय मतदारसंघ वायनाडला भेट देत आहेत. ते शनिवारी सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता कोईम्बतूरला पोहोचले. येथून ते पुढे वायनाडला रवाना झाले. वायनाडमध्ये त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी, दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी उटीजवळील मुथुनाडू गावात तोडा आदिवासी समाजातील लोकांची भेट घेतली. येथील लोकांनीही त्यांचे जोरदार स्वागत केल्यानंतर राहुल गांधींनीही आदिवासींसोबत डान्स केला.
राहुल यांनी वायनाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. खासदारपदी बहाल झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच वायनाड दौरा होता. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या भेटीची माहिती दिली होती. वायनाडच्या लोकांना लोकशाहीचा विजय झाल्यामुळे खूप आनंद झाल्याचे म्हटले होते. यापूर्वी राहुल गांधी खासदारपद गमावल्यानंतर 16 दिवसांनी 10 एप्रिल 2023 रोजी वायनाडला गेले होते. त्यानंतर येथील एका जाहीर सभेत बोलताना माझे संसदेचे सदस्यत्व काढून घेण्यात आले आहे. माझे घर हिसकावून घेण्यात आले, माझ्यामागे पोलीस लावले गेले, पण या सगळ्याचा मला काही फरक पडत नाही. त्यांनी मला तुऊंगात टाकले तरी मी प्रश्न विचारत राहीन, असे सुनावले होते.
मोदी आडनाव प्रकरणी 23 मार्च रोजी अहमदाबाद सत्र न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर 24 मार्च रोजी त्यांची खासदारकी गेली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्याला सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर आता त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली असून प्रथमच ते आपल्या वायनाड मतदारसंघात पोहोचले आहेत.









