ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे(Rahul Shewale) यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम असून यावेळी त्यांनी सावरकरांचे पत्र वाचून दाखवले. तसेच, हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा रोखून दाखवाच, असे आव्हानही भाजपाला दिले आहे.
राहुल गांधी म्हणाले भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते आज (१७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान ,भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशातच युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नसल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले. त्यांचे कर्ज माफ होत नाही, संकटाच्या काळात त्यांना मदत मिळत नसल्याचे गांधी म्हणाले. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
माझा फोकस भारत जोडो यात्रेवर आहे. या यात्रेला अजून काही महिने लागणार आहेत. लोकांचं प्रेम मिळत आहे. लोकांकडून शिकायला मिळत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आमचं काम भारत जोडायचा आहे. हे आम्हाला करायचं आहे. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाही. आमची यात्रा रोखायची असेल तर रोखा. काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटलं ही यात्रा रोखली पाहिजे तर त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.