खेळातही राजकारण आणण्याच्या प्रयत्नावर टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिंपिकमध्ये अपात्रतेचा फटका बसला आहे. तिने दोन दिवसांपूर्वीच 50 किलो वजनगटाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करुन भारतासाठी नवा विक्रम केला होता. तथापि, अंतिम स्पर्धा होण्याच्या आधी तिचे नियमाप्रमाणे वजन करण्यात आले. ते 150 ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला अंतिम स्पर्धा खेळण्यापासून निर्बंधित करण्यात आले. आता तिला रौप्य पदकही मिळणार नाही. हा भारताला आणि तिला स्वत:लाही मोठाच धक्का आहे.
मात्र, तिच्या या अंतिम फेरीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर राजकारणही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या राजकारणाची पार्श्वभूमी एक वर्षापूर्वी काही कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जे जोरदार आंदोलन केले होते, त्या आंदोलनाशी जोडली गेली आहे. विनेश फोगटने त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘तेरी कबर खुदेगी’ असे विधान केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मंगळवारी ऑलिंपिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांनी तिचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे कुस्तीपटूंवर अन्याय केल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर टीकाही करुन खेळाशी राजकारण जोडण्याचा प्रयत्न केला.
जयराम रमेश यांचे खोचक विधान
काँग्रेसचे पदाधिकारी जयराम रमेश यांनी ‘आता आपले नॉनबॉयोलॉजिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी विनेशचे अभिनंदन करतील का,’ अशी खोचक पृच्छाही केली. तथापि, राहुल गांधींनी अभिनंदन केल्यानंतर आणि जयराम रमेश यांनी खोचक प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून विचारत डिवचले होते. पण नंतर काही तासांमध्येच दुर्दैवाने फोगट अपात्र ठरल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून घोषित करण्यात आले. हे वृत्त येताच सारा देश दु:खसागरात लोटला गेला.
पुन्हा ‘पनवती’चा मुद्दा उपस्थित
नुकत्याच झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. तो सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचा एक तास प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची पनवती लागली, म्हणून भारताचा पराभव झाला, अशी टिप्पणी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानात एका निवडणूक प्रचारसभेतही अशी टिप्पणी करुन पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही काळच्या उपस्थितीला जबाबदार धरले होते. मात्र, आता ऑलिंपिकच्या अंतिम सामन्याआधी काहीकाळ राहुल गांधींनी विनेश फोगटचे अभिनंदन केले. पण त्यानंतर काही वेळातच दुर्दैवाने विनेश फोगट अपात्र ठरली. आता तिला ‘पनवती’ राहुल गांधींची लागली, असे म्हणायचे का, असा प्रश्न विचारला जात आहे. तुम्ही जे पेरता, तेच उगवले आहे, अशीही टिप्पणी या संबंधात सध्या केली जात आहे.









