संसद भवन परिसरातील धक्काबुक्कीप्रकरणी एफआयआर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या एफआयआर प्रकरणाची चौकशी आता गुन्हे शाखा (क्राईम ब्रान्च) करणार आहे. गुरुवारी संसदेच्या संकुलात झालेल्या धक्काबुक्तीबाबत भाजप खासदारांनी काँग्रेस नेत्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्धचा खटला गुन्हे शाखेकडे सोपवला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. संसद भवनाच्या परिसरात गुरुवारी झालेल्या हाणामारीत प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत हे भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते.
दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर संसदेच्या संकुलात झालेल्या हाणामारीच्या वेळी शारीरिक हल्ला आणि चिथावणी दिल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. आता गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करेल. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावू शकतात आणि या घटनेचे साक्षीदार असलेल्या इतर खासदारांचे जबाबही नोंदवू शकतात. संसद मार्ग पोलीस स्थानकामध्ये गुरुवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115 (स्वेच्छेने दुखापत करणे), 117 (स्वैच्छिकपणे गंभीर दुखापत करणे), 125 (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कृती), 131 (गुन्हेगारी शक्तीचा वापर) आणि 3 (5) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत त्यांच्यावर हाणामारीच्या वेळी ‘हल्ला करून चिथावणी दिल्याचा’ आरोप करण्यात आला आहे.









