प्रतिनिधी/ बेळगाव
श्री महिला क्रेडिट सौहार्द संघ नियमिततर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी गणाधीश लॉन येथे राहुल देशपांडे कलेक्टिव्ह हा कार्यक्रम होणार आहे. राहुल देशपांडे या कार्यक्रमामध्ये शास्त्राrय व फ्युजन संगीत सादर करतील.
‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी कामासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध शास्त्राrय गायक कै. वसंतराव देशपांडे यांचे ते नातू आहेत. त्यांचा वारसा पुढे चालवताना त्यांनी स्वत:च्या गायनाचा एक खास ठसाही उमटवला आहे. अनेक संगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकातही त्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका श्री महिलाच्या शाखांमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एका प्रवेशिकेवर एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाईल. याचवेळी श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी लिमिटेडतर्फे सुवर्ण कर्ज योजनेचा शुभारंभ होणार आहे.
राहुल देशपांडे यांच्या कार्यक्रमासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे, याची दखल घेऊन आयोजकांनी गणाधीश यांच्या मुख्य सभागृहाच्या बाजूला एलईडी
स्क्रीनची व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ रसिकांना घेता येईल, असे कळविण्यात आले आहे.









