बांगलादेशच्या पहिल्या डावात 369 धावा, आयर्लंडचा दुसरा डाव गडगडला
वृत्तसंस्था/ मिरपूर
येथे सुरु असलेल्या आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी बांगलादेशचा पहिला डाव 369 धावांत आटोपला. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना आयर्लंडचीही घसरगुंडी उडाली असून दुसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 4 गडी गमावत 27 धावा केल्या होत्या. अद्याप ते 128 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस हेरी टेक्टर 8 व पीटर मूर 10 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, बांगलादेशने 2 बाद 34 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. सुरुवातीला मोमिनल हक 17 धावांवर बाद झाला. यानंतर मुशफिकुर रहीम व कर्णधार शकीब अल हसन यांनी चौथ्या गड्यासाठी 159 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. रहीमने शानदार शतक झळकावताना 166 चेंडूत 15 चौकार व 1 षटकारासह 126 धावा केल्या तर शकीबने 14 चौकारासह 87 धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना शकीब बाद झाला. यानंतर लिटॉन दास (43) व मेंहदी हसन मिराज (55) यांनी एकेरी दुहेरी धावांवर भर संघाला त्रिशतक फलकावर लावले. ही जोडी बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने बांगलादेशचा पहिला डाव 80.3 षटकांत 369 धावांवर आटोपला. आयर्लंडकडून मॅकब्रीनने सर्वाधिक 6 गडी टिपले.

दुसऱ्या डावात खेळताना शकीब अल हसन व तैजुल इस्लाम यांच्या गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव गडगडला. दुसऱ्या दिवसअखेरीस आयर्लंडने 4 गडी गमावत 27 धावा केल्या होत्या. सलामीवीर कमिन्स 1 धाव काढून बाद झाला तर जेम्स मेकॉलमला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार बेलबर्नीने 8 तर कॅम्फरने 1 धावा काढल्या. दिवसअखेरीस हेरी टेक्टर 8 व पीटर मूर 10 धावांवर खेळत होते. शकीब व तैजुल इस्लामने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : आयर्लंड प.डाव 214 व दु.डाव 4 बाद 27 (टेक्टर खेळत आहे 8, पीटर मूर खेळत आहे 10, शकीब व तैजुल इस्लाम प्रत्येकी दोन बळी). बांगलादेश पहिला डाव 80.3 षटकांत सर्वबाद 369 (मुशफिकुर रहीम 126, मिराज 55, लिटॉन दास 43, शकीब अल हसन 87, मॅकब्राईन 118 धावांत 6 बळी).









