वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विंडीजविरुद्ध होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने इंग्लंडमध्ये इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या लिसेस्टरशायर संघाबरोबर करार केला आहे.
नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीत माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने दोन्ही डावात चिवट फलंदाजी केली होती. गेल्या जानेवारी महिन्यात अजिंक्य रहाणेने लिसेस्टरशायर क्लबबरोबर करार केला होता. आता तो लिसेस्टरशायर संघाकडून इंग्लिश कौंटी डिव्हीजन 2 स्पर्धेत 8 सामन्यात खेळणार आहे. त्याचप्रमाणे तो इंग्लंमध्ये होणाऱ्या रॉयल लंडन चषक एक दिवशीय स्पर्धेतही लिसेस्टरशायर क्लबचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सदर स्पर्धा जून ते सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारत विंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 24 जुलैला संपल्यानंतर अजिंक्य रहाणे भारतात न येतेना थेट इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. इंग्लिश कौंटी स्पर्धेतील सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चार सामन्यात अजिंक्य रहाणे खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लिश कौंटी स्पर्धेत अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा खेळत आहे. यापूर्वी म्हणजे त्याने 2019 च्या हंगामात हॅम्पशायर क्लबकडून या स्पर्धेत खेळला होता.









