वृत्तसंस्था / बेंगळूर
मंगळवारी येथे झालेल्या 86 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत कर्नाटकाचा एम. रघू तसेच हरियाणाची देविका सिहाग यांनी एकेरीतील अजिंक्यपद पटकाविले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकाच्या रघूने माजी विजेत्या मिथून मंजुनाथचा 14-21, 21-14, 24-22 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना तासभर चालला होता. रघुचे राष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेचे विजेतेपद आहे. रघुने अलिकडेच इजिप्त आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या 19 वर्षीय देविका सिहागने श्रीयांशी वलिशेट्टीचा 21-15, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत जेतेपद मिळविले. सिहागने यापूर्वी स्वीडीश आणि पोर्तुगाल बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकाविले होते. अर्ष मोहम्मद आणि संस्कार सारस्वत या जोडीने पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना टॉपसिडेड जोडी पी. नवीन आणि व्ही. लोकेश यांचा 21-12, 12-21, 21-19 असा पराभव केला. आयुष अगरवाल आणि श्रुती मिश्रा यांनी मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविताना रोहन कपूर व ऋत्विका शिवानी यांचा 21-17, 21-18 असा पराभव केला. आरती आणि वर्षिनी यांनी महिला दुहेरीची जेतेपद मिळविताना प्रिया देवी व श्रुती मिश्रा यांचा 21-18, 20-22, 21-17 असा पराभव केला









