नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांचे नावही दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळय़ात समाविष्ट केले आहे. चढ्ढा यांचे नाव अतिरिक्त आरोपपत्रात घालण्यात आले. मात्र, त्यांचे नाव ‘आरोपी’ म्हणून समाविष्ट करण्यात आले नसून संबंधित म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. चढ्ढा हे या घोटाळय़ातील आरोपींच्या एका बैठकीत सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचे नाव घालण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे कारागृहात असून त्यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांच्या निवासस्थानी राघव चढ्ढा, पंजाब सरकारचे वित्त अधिकारी, उत्पादन शुल्क आयुक्त वरुण रुजाम, एफटीसी आणि पंजाब सरकारचे इतर अधिकारी यांची बैठक झाली होती. या बैठकीत विजय नायर हेही उपस्थित होते, अशी माहिती आरोप पत्रात देण्यात आली असून चढ्ढा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणी अतिरिक्त आरोपपत्र सादर केले होते. त्या आरोपपत्रात प्रथमच मनिष सिसोदिया यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. तथापि, आम आदमी पक्षाने सर्व आरोप फेटाळले असून केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धंाrपोटी हे प्रकरण निर्माण केल्याचा दावा केला आहे.









