सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निलंबनाच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची माफी मागितली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यासंबंधी न्यायालयाला माहिती दिली असून आता चड्ढा यांना विशेषाधिकार समितीसमोर एकदा हजर राहावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी होणार आहे. गेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आप नेते चड्ढा यांना अध्यक्ष जगदीप धनखड यांची भेट घेऊन माफी मागण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणी पूर्ण केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राघव चड्ढा यांनी अलीकडेच सोशल मीडिया ‘एक्स’वर आपण न्यायालयाच्या आदेशानुसार माफी मागण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. आपण राज्यसभा अध्यक्षांची वैयक्तिकरित्या भेट घेणार असून त्यांची वेळ मागितली असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दोघांचीही भेट झाली असून माफी मागण्यात आल्याचे आता न्यायालयाला सांगण्यात आले.









