ग्रीसमध्ये झाला हेरगिरीचा प्रयत्न : सुरक्षा यंत्रणांकडून तपास
वृत्तसंस्था/अथेन्स
ग्रीसच्या तंगरा शहरात 4 चिनी नागरिकांना राफेल लढाऊ विमाने आणि हेलेनिक एअरोस्पेस इंडस्ट्रीच्या (एचएआय) सुविधांची छायाचित्रे काढताना अटक करण्यात आली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चीन राफेल लढाऊ विमानांविषयी दुष्प्रचार करत असताना हा प्रकार घडला आहे. ग्रीसने या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मानले आहे. हे चिनी नागरिक एखाद्या संघटनेसाठी काम करत होते का हे आता तपासले जाणार आहे. ग्रीसच्या तंगरा वायुतळानजीक 4 चिनी नागरिकांना हेलेनिक एअर फोर्स पोलिसांनी पकडले आहे. या चिनी नागरिकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
हे चिनी नागरिक राफेल लढाऊ विमाने आणि संवेदनशील सैन्यसुविधांची छायाचित्रे काढत होते. प्रारंभी हेलेनिक एअरोस्पेस इंडस्ट्रीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या चिनी नागरिकांना तेथून निघून जाण्यास सांगितले. परंतु हे चिनी नागरिक तेथून काही अंतर जात छायाचित्रे काढत राहिले. हेलेनिक एअर फोर्स पोलिसांनी त्यांना पकडत तंगरा पोलिसांकडे सोपविले आहे. या चिनी नागरिकांच्या कॅमेऱ्यात अनेक छायाचित्रे मिळाली असून ती हेरगिरीचा संशय वाढविणारी आहेत. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात असून सुरक्षा यंत्रणा या तपासात सामील झाल्या आहेत.
चीनचा राफेल विरोधात कट
ऑपरेशन सिंदूरनंतर चीन राफेल विमानांच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फ्रान्सने अलिकडेच केला होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय वायुदलाने राफेल लढाऊ विमानाचा वापर करत पाकिस्तान विरोधात यशस्वी हल्ले केले होते. परंतु चीनने स्वत:च्या दूतावासांच्या माध्यमातून राफेलच्या विक्रीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत अनेक देशांना चिनी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा सल्ला दिला. राफेल लढाऊ विमाने भारत आणि ग्रीस या दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चीन या विमानांचे तंत्रज्ञान जाणून घेऊ इच्छित आहे.









