माद्रीद (स्पेन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इमा राडुकानूने एकेरीची तिसरी फेरी गाठताना मार्टा कोस्टय़ुकचा पराभव केंला. त्याचप्रमाणे या स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका व स्पेनची गार्बेनी मुगुरूझा यांचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. दुसऱया फेरीतील सामन्यात नवव्या मानांकित राडुकानूने युक्रेनच्या मार्टा कोस्टय़ुकचा 6-2, 6-1 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. गेल्या उन्हाळी मोसमात राडुकानूने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. दुसऱया एका सामन्यात टिचमनने लैला फर्नांडिसवर 6-4, 6-4 अशी मात केली. स्पेनच्या सारा सोरीबेस टोर्मोने जपानच्या माजी टॉप सीडेड नाओमी ओसाकाला 6-3, 6-1 अशा सरळ सेटस्मध्ये पराभवाचा धक्का देत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 90 मिनिटे चालला होता. दुसऱया एका सामन्यात कॅसेटकिनाने ग्रीसच्या चौथ्या मानांकित सॅकेरीचा 3-6, 6-3, 6-1, युक्रेनच्या कॅलिनीनाने स्पेनच्या मुगुरूझाचा 6-3, 6-0, अँड्रेस्क्यूने डॅनिली कॉलिन्सचा 6-1, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.