133 कोटी लिटर किरणोत्सर्गी पाणी सोडण्याची जपानची योजना : चीन अन् दक्षिण कोरियाचा विरोध
वृत्तसंस्था/ टोकियो
जपान स्वत:च्या खराब झालेल्या फुकुशिमा आण्विक प्रकल्पातील ट्रीटेड रेडिओअॅक्टिव्ह वॉटर गुरुवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी प्रशांत महासागरात सोडणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यावर पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मंगळवारी याची घोषणा केली आहे. हवामान सुरळीत राहिल्यास आम्ही हे काम सुरू करणार असल्याचे किशिदा यांनी म्हटले आहे. तर चीनच्या विदेश मंत्रालयाने याप्रकरणी विरोध दर्शविला आहे.
किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडणे योग्य पर्याय नाही. याचा प्रभाव पुढील काळात बदलला जाऊ शकत नसल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वेंग वेनबिन यांनी म्हटले आहे. यापूर्वी मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत देखील जपानच्या या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे (आयएईए) अध्यक्ष राफेल ग्रासी यांनी जपानमधील आण्विक प्रकल्पाची पाहणी केली होती. जपानकडून किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्याच्या निर्णयाला किनारपट्टीत राहणारे लोक तसेच चीन अन् दक्षिण कोरियाच्या जनतेनेही विरोध केला आहे.
किरणोत्सर्गी पाणी सोडण्यात आल्याने मासेमारी अन् लोकांना कुठलेच नुकसान होणार नसल्याचे आश्वासन जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी टोकियोतील जपानच्या मत्स्यउद्योगाशी निगडित लोकांना दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा विषयक आयोगाने जुलै महिन्यात किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास जपानला मंजुरी दिली होती.
30 वर्षांचा कालावधी लागणार
एकदा प्रकल्पातून किरणोत्सर्गी पाणी सोडण्याचे काम सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात जपानी माशांची मागणी रोडावणार असल्याची भीती तेथील मत्स्यव्यावसायिकांना आहे. जपान सरकारनुसार प्रकल्पातून पूर्ण पाणी सोडण्यास सुमारे 30 वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रकल्पात सध्या 133 कोटी लिटर पाण्याला सुमारे 1 हजार ब्ल्यू टँकर्समध्ये साठविण्यात आले आहे. ऑलिम्पिकमधील 500 जलतरण तलाव भरतील इतका हा पाण्याचा साठा आहे. या पाण्याला तेथून हटविण्यात आल्यावरच आण्विक प्रकल्प नष्ट करता येणार आहे.
त्सुनामीमुळे प्रकल्पाचे नुकसान
प्रशांत महासागरात 133 कोटी लिटर किरणोत्सर्गी पाणी सोडण्याबद्दल जपानमधील मत्स्यउद्योग आणि नागरी संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. मार्च 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा आण्विक प्रकल्पातील कूलिंग आणि इलेक्ट्रिसिटी सिस्टीम ठप्प झाली होती. उष्णतेमुळे तेथील तिन्ही रिअॅक्टर्सचे कोर वितळून गेले होते. यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावला होता.
पाण्यात किरणोत्सर्गी पदार्थ
जपानच्या विदेश मंत्रालयानुसार पाण्याला महासागरात सोडण्यापूर्वी ते साफ करण्यात आले आहे. परंतु पाण्यात अद्याप ट्रीटियमचे अंश असल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. ट्रीटियम एक किरणोत्सर्गी पदार्थ असून तो पाण्यापासून वेगळा करणे अत्यंत अवघड असते. ट्रीटियमचा संपर्क झाल्याने फारसे नुकसान होत नाही, परंतु एखाद्या शरीरात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात पोहोचल्यास कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. जपानमध्ये आण्विक प्रकल्पातील पाणी आणि निरुपयोगी सामग्री अनेक वर्षांपासून समस्या ठरली आहे. किरणोत्सर्गी पाणी प्रशांत महासागरात सोडण्याच्या निर्णयाला दक्षिण कोरिया, चीन आणि ऑस्ट्रेलियाने विरोध दर्शविला आहे. आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार ट्रीटियमचे प्रमाण कमी केल्यावरच हे पाणी सोडणार असल्याचे आश्वासन जपानने वारंवार दिले आहे.









