भाडेकरुंनी खोलीत आणले मशिन : शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस
फोंडा : पणसुले-धारबांदोडा येथे भर लोकवस्तीत अंत्यत धोकादायक ‘रेडीएशन मशिन’ बसविण्यात आल्याचा भांडाफोंड येथील एका रहिवाशाने केला आहे. याप्रकरणी रितसर तक्रार धारबांदोडा पंचायतीतर्फे फोंडा पोलिसस्थानकात दाखल करण्यात आली आहे. फोंडा पोलिसांनी ताबडतोब कारवाई करताना रेडिएशन मशिन सील केले असून भाडयाच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. मशिन हाताळण्यासाठी कारवार येथील नौदलाच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे. पणसुले धारबांदोडा येथे भाड्याच्या खोलीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तेथे खळबळ उडाली आहे. सदर मशिन चोरीचे आहे की कुणा कंत्राटदाराच्या कामगाराचे, याविषयी फोंडा पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
पीट रूम’ ऐवजी मारला ‘पीट होल’
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहाज बांधणी व अन्य औद्योगिक कामकाजातील लोखंडाला वेल्डिंग मारल्यानंतर त्याची क्षमता जाणून घेण्यासाठी हे धोकादायक रेडिएशन मशिन वापरात येते. या मशिनमधून बाहेर पडणारी धोकादायक किरणे सुमारे 200 मीटर कार्यक्षेत्रातील मानवी जीवाला अंत्यत धोकादायक ठरत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी हे मशिन बसविण्याची परवानगी मिळत नाही. लोकवस्तीपासून दूर औद्योगिक परिसरात पीट रूम उभारून हे मशिन बसविण्यात येत असते. मात्र या दोघां भाडोत्रींनी घरमालकाच्या डोळ्यात धूळ चारून खोलीतच पीट रूमऐवजी ‘पीट होल’ म्हणजेच 1 मिटर खड्डा खोदून हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
एका बिगरगोमंतकियाने घरमालकाला भाडे वाढवून देण्याचे आमिष दाखवून त्याची खोली भाडयाने घेतलेली आहे. खोलीत 1 मीटर खोल मोठा खड्डा खणून त्यात ते मशीन ठेवत असल्याचे उघडकीस आले आहे. या मशिनद्वारे येथे काम करण्यात येत होते की नाही? याबाबत अद्याप पक्की माहिती मिळू शकलेली नाही. मशिन हाताळण्यासाठी तज्ञ टिमची आवश्यकता असल्याने फोंडा पोलिसांनी घरमालक व येथे भाडयाच्या खोलीत असलेल्या भाडेकरूंच्या जबानी घेतलेल्या आहेत.
शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे झाला भांडाफोड
या मशिनाची किंमत सुमारे 12 लाख रूपये असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मशिन गरजेच्यावेळी बोरी येथे नेण्यात येत होते. त्यानंतर खोलीतील खड्डयात लपून ठेवण्यात येत होते. खोलीच्या जवळच एका वर्कशॉपमध्ये तांत्रिक बाजू ज्ञात असलेल्या एका व्यक्तीने यावर बरेच दिवस सखोल अभ्यास केला. रेडिएशनचा उगम कुठून होतोय याची पक्की माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही केली. त्यामुळे शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेडिएशन मशिन खोलीत असल्याचा भांडाफोड झाला. भाडोत्री वास्तव्यास असलेल्या खोलीची पडताळणी केल्यानंतर खोल खड्डयात धोकादायक मशिन आढळून आल्यानंतर पोलिसांची व घरमालकांची धावपळ उडाली. याप्रकरणी फोंडा पोलिस कोणती कारवाई करणार यावर ग्रामस्थांनचे लक्ष लागून राहिले आहे.
रेडिएशन मशिन जहाजबांधणीत वापरात येते
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरी येथील एका जहाजबांधणी कंपनीत कामाला असलेले दोन कामगार येथे राहत असल्याचे उघड झाले आहे. हे रेडिएशन मशीन कंपनीत वापरण्यात येते. सदर घटनेची माहिती मिळताच धारबांदोडयाचे सरपंच बालाजी गावस यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर फोंडा पोलिस स्थनाकात रितसर तक्रार दाखल केलेली आहे. मशिन बसविण्यात आलेल्या ठिकाणपासून हाकेच्या अंतरावर पेट्रोलपंप आहे. त्याच्यापुढे सरकारी इस्पितळ व लोकवस्ती असल्याने येथील नागरिकांनी हरकत घेतली आहे.









