सरवडे प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी श्रीपती रामा पाटील यांच्या सुमारे ६५ हजार ५०० किंमतीच्या दोन १९ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सरवडे येथील श्रीपती रामा पाटील (वय ९४) हे दुपारी तीनच्या सुमारास शंकरराव दतात्रय पाटील यांच्या कटीवर बसले होते. त्यावेळी खाकी शर्ट व पँट घातलेली एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन आपण पोलिस असल्याचे सांगून पाणवटा गल्ली येथे घेऊन गेली. त्याच वेळी समोरुन आलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीकडून गळ्यातील चेन मागून घेतली. तसेच पाटील यांना देखील हातातील अंगठ्या द्या त्या पुडीत बांधून देतो असे सांगितले. समोरच्या माणसाने चेन काढून दिल्याने पाटील यांनी हातातील दोन अंगठ्या काढून दिल्या. तोतया पोलिसाने पाटील यांच्या हातात पुडी दिली व निघून गेला. पुडी उघडून पाहिले तर त्यामध्ये खडे होते. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोतया पोलिस दिसतो का पाहिले परंतु तो पसार झाला होता. तसेच गळ्यातील चेन दिलेला इसम त्याचा साथीदार असल्याचे नंतर लक्षात आले. राधानगरी पोलिसांत दोन अज्ञातांवर तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









