नदीपात्रात व्यक्ती किंवा जनावरांना सोडू नये, जलसंपदा विभागाकडून आवाहन
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी धरणाची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजता 366.50 फूट इतकी नोंदवली गेली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरायला केवळ १ फूट पाणी बाकी असून, मागील चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत आणि मुसळधार पाऊस सुरू आहे.
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील २४ तासांत धरण भरून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाज्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोगावती नदीच्या पात्रात अचानक व मोठ्या प्रमाणात पाणीपातळी वाढ होऊ शकते.
खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सूचना केल्या आहेत. यामध्ये
नदीकाठी व नदी पात्रामध्ये राहणारे नागरिक, जनावरे व शेतीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, पंपिंग सेट, विद्युत मोटारी, शेती अवजारे, इतर साहित्य नदीकाठापासून दूर ठेवावीत.
नदीपात्रात कोणताही व्यक्ती किंवा जनावरांना सोडू नये. ग्रामपंचायतीमार्फत दवंडी व सोशल मीडियावरून ही माहिती गावागावात पोहोचवावी. या संभाव्य पुरपरिस्थितीत होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस जलसंपदा विभाग, जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.








