राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी (दाजीपूर) अभयारण्य क्षेत्रातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करून गावकऱ्यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याबरोबर अभयारण्य क्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकासासाठी 5 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या मंजूर निधीचा पर्यावरण पुरक आराखडा तयार करा असे निर्देश आमदार प्रकाश आबिटकर यांनी वनविभागाचे अधिकारी व महसूल विभागाला दिले.
ते राधानगरी पंचायत समिती येथे आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी गोकूळ संचालक अभिजित तायशेटे, तहसीलदार अनिता देशमुख, गट विकास अधिकारी संदीप भंडारी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गेली अनेक वर्षापासून प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. अभयारण्य क्षेत्रातील 22 गावांच्या सर्वांगीण विकासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून प्रत्येक गावास 25 लाख या प्रमाणे 5 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधितून पर्यावरणपूरक असे होम स्टे, अभयारण्याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षीत गाईड्स, सौरकुंपन, एल.पी.जी.गॅस या योजनांचा प्राधान्यक्रमाने विचार करून खर्च करण्याच्या सुचना केल्या. यामाध्यमातून शेतीला पूरक जोडधंदे देवून तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे आणि गावकऱ्यांच्या सहभागातून वन्यजीवांचे संरक्षण करण्याबरोबर गावातील व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे म्हणाले की, दाजीपूर अभयारण्यामध्ये असणाऱ्या पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच अभयारण्यामध्ये पर्यटनदृष्ट्या कामे करण्यासाठी आमदार आबिटकर यांनी निधी मंजूर करावा असे म्हणाले.
विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आढावा बैठकीस माजी उपसभापती अरुणराव जाधव, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, उपअभियंता सुरेश खैरे, राजेंद्र शेट्टी, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, अजित माळी, अविनाश ताईनाक, राजेंद्र वाडेकर, विश्वास राऊत, विलास डवर, फारूख नावळेकर, यांच्यासह वन्यजीव वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.