राधानगरी- भुदरगड मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून नूतन पालकमंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा; बिद्री साखर कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचे संकेत; बिद्री निवडणुकीत भाजपचा मोठा गट सत्तारूढसोबत जाण्याची शक्यता
कृष्णात चौगले कोल्हापूर
राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्टवादी (अजित पवार गट) हा महायुतीमधील घटक पक्ष झाला असला तरी स्थानिक पातळीवरील राजकारण पाहता पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे पारंपारिक विरोधक आहेत. पण भाजप कार्यकारिणी निवड प्रक्रियेवर नाराज असलेल्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र भूमिका घेत पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार केला. सकृतदर्शनी या शुभेच्छा दिसत असल्या तरी त्यामध्ये आगामी बिद्री साखर कारखान्याचे राजकारण दडले असल्याची स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा रंगली आहे.
सहकार विभागाकडून बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ गटाच्याविरोधात खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजीत घाटगे यांच्याकडून विरोधी आघाडी बांधली जाण्याची शक्यता आहे. पण यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर आदी अनेक प्रमुख पदाधिकारी समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शक्यता कमी आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक कार्यकारीणी निवड प्रक्रियेवर राधानगरी व भुदरगड तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. परिणामी या दोन तालुक्यात भाजपमध्ये स्वतंत्र प्रबळ गट तयार होत आहे. त्यामुळे समरजीत घाटगे हे विरोधी आघाडीसोबत गेले तरी नाराज कार्यकर्ते त्यांना कितपत साथ देतील ? हे आगामी काळातच समजणार आहे.
भाजपच्या नाराज गटातील कार्यकर्त्याला मिळणार उमेदवारी ?
कारखान्याच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कोट्यातून जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे यांना संधी दिली होती. खोराटे यांना पाच वर्ष उपाध्यक्ष पद देखील मिळाले. पण गेल्या पाच वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जनता दलाची सध्याची ताकद पाहता त्यांना पुन्हा सत्ताधारी गटातून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी सत्तारूढसोबत जाण्यासाठी तयार असलेल्या भाजपच्या नाराज गटातील कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे.
सत्ताधारी आघाडीसोबत जाण्याचे संकेत
भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राधानगरी व भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन पालकमंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांनी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ‘आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत’ असे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, पंचायत समिती भुदरगडचे माजी सभापती विलास बेलेकर (करडवाडी), भुदरगड तालुका संजय गांधी योजनेचे माजी सदस्य नामदेव चौगले (मडिलगे खुर्द), सुनील तेली (शेणगांव), भगवान शिंदे (सालपेवाडी), भाजपा गारगोटी माजी शहराध्यक्ष राहुल चौगले, माजी .सरपंच रमेश रायजादे (पडखंबे), आनंदराव रेडेकर, अमोल पाटील (खानापूर), बाजीराव देसाई (कडगांव), अशोक येलकर (बेगवडे), अविनाश कवडे (बसरेवाडी), पी बी खुटाळे, (मोरेवाडी), रामचंद्र पाटील, अनिल पाटील (आदमापूर), मोहन सूर्यवंशी, लखन लोहार, प्रविण पाटील (आकुर्डे), संजय भोसले (मडिलगे बु), पांडुरंग वायदंडे (नाधवडे), निवास देसाई (टिक्केवाडी), सुरेश किल्लेदार (गंगापूर), योगेश पाटील, सचिन देसाई (म्हसवे) आदी उपस्थित होते.









