वृत्तसंस्था/मुंबई
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि यजमान इंग्लंड महिला संघात तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय महिला संघामध्ये दुखापतग्रस्त सुची उपाध्यायच्या जागी डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादवची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. 20 वर्षीय सुची उपाध्याय ही डावखुरी फिरकी गोलंदाज असून तिने गेल्याच महिन्यात लंकेबरोबर झालेल्या तिरंगी मालिकेत आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले होते.
पण तिला स्नायु दुखापत झाल्याने ती इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या जागी राधा यादवला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघातील पहिला टी-20 सामना 28 जूनला नॉटिंगहॅम येथे, दुसरा सामना 1 जुलैला ब्रिस्टॉलमध्ये, तिसरा सामना 4 जुलैला ओव्हल, चौथा सामना 9 जुलैला मँचेस्टरमध्ये तर पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 12 जुलैला बर्मिगहॅम येथे खेळविला जाईल. या मालिकेनंतर वनडे मालिका सुरू होईल. या मालिकेतील पहिला सामना 16 जुलै साऊदम्पटन येथे, दुसरा सामना 19 जुलैला लॉर्ड्सवर तिसरा आणि शेवटचा सामना चेस्टर ली स्ट्रीट येथे होईल.
भारत महिला टी-20 संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमीमा रॉड्रीग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटीया, हर्लिन देवोल, दिप्ती शर्मा, तेजल हसबनीस, स्नेह राणा, श्रीचरणी, अमनजोत कौर, अरुंधती रे•ाr, क्रांती गौड, सायली सातघरे आणि राधा यादव.
भारत महिला वनडे संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हर्लिन देवोल, जेमीमा रॉड्रीग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटीया, तेजल हसबनीस, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, अमनजोत कौर, अरुंधती रे•ाr, क्रांती गौड, सायली सातघरे आणि राधा यादव.









