दोन कळपांमध्ये तुफान घमासान, एकाचा ‘विजय’
वृत्तसंस्था / कुनो अभयारण्य
दोन किंवा अधिक गुंड टोळ्यांमधील गँगवॉर आपल्या परिचयाचे आहे. त्यांच्यातील रक्तरंजित झगड्यांना ‘राडा’ अशी संज्ञा आहे. बुधवारी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात असेच दृष्य पहावयास मिळाले आहे. मात्र, या राड्यात सहभागी झालेली माणसे नसून या अभयारण्यात जवळपास वर्षभरापूर्वी सोडण्यात आलेले चित्ते होते. या चित्त्यांच्या दोन कळपांमध्ये आपल्या भूभागाच्या निश्चितीकरणासाठी तुफान संघर्ष झाला. या संघर्षात अखेर एका गटाचा विजय झाला. पराभूत गटाने माघार घेतल्यानंतर हा जीवघेणा संघर्ष थंडावला.
काही वनरक्षकांनी हा रक्तरंजित संघर्ष प्रत्यक्ष पाहिला. त्यांनी चित्त्यांच्या या गटांची अनुक्रमे ‘द रॉक स्टार्स’ आणि ‘द व्हाईट वॉकर्स’ अशी नावे ठेवली आहेत. हे नर चित्त्यांचे कळप आहेत. वन्य प्रदेशात आपला भूभाग निश्चित करण्यासाठी असे संघर्ष एकाच प्रजातीच्या दोन किंवा अधिक कळपांमध्ये किंवा भिन्न प्रजातींच्या कळपांमध्ये होत असतात. त्यात नवीन काही नाही. असे संघर्ष मादी प्राण्यांवर वर्चस्व मिळविण्यासाठींही होतात, असे प्राणीतज्ञांचे मत आहे.
जोरदार संघर्ष
कुनोमध्ये झालेला हा संघर्ष जवळपास एक तास चालला. दोन्ही कळपांमधील नर चित्त्यांनी एकमेकांना नखांनी ओरबाडल्याने आणि चावे घेतल्याने तीन ते चार चित्ते जखमी झाले. त्यांच्यातील एका चित्त्याच्या जखमा अधिक गंभीर आहेत. मात्र, नंतर ‘द रॉक स्टार्स’ या गटाची सरशी झाली आणि ‘द व्हाईट वॉकर्स’ या गटाला माघार घ्यावी लागली. त्यानंतर हा थरारक संघर्ष थांबला आणि दोन्ही गट आपापल्या भूभागांमध्ये परतले, अशी माहिती वनरक्षकांनी दिली. या संघर्षाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले आहे किंवा नाही, याची माहिती मिळालेली नाही. संघर्ष घडत असताना चित्त्यांनी केलेल्या चित्कारांनी परिसर दणाणून गेला होता.
असे का घडते
वन्य प्राण्यांमध्ये असे संघर्ष नेहमी होतात. विशेषत: प्रजजनाच्या काळाआधी माद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी, किंवा भक्ष्य सुनिश्चितीकरिता भूभाग निश्चित करण्यासाठी असे संघर्ष होतात. चित्ता हा कळपाने राहू शकतो. त्यामुळे दोन किंवा अधिक कळपांमध्ये संघर्ष होतात. एका कळपाने दुसऱ्या कळपाच्या भूभागात घुसखोरी केली की संघर्षाला तोंड फुटते. नंतर एका गटाने माघार घेतल्यानंतर तो थांबतो. पण काहीवेळा तुल्यबळ परिस्थिती असेल तर चित्त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. असे संघर्ष हा वन्य प्राण्यांचा जीवनाचाच भाग असल्याने ते थांबविता येत नाहीत. अशा संघर्षांमध्ये वनरक्षकही हस्तक्षेप करु शकत नाहीत, अशीही माहिती या संदर्भात देण्यात आली.
‘शौर्य’चे शौर्य
दोन्ही कळपांमधींल चित्त्यांना नावेही देण्यात आली आहे. द रॉक स्टार्स या कळपात असलेले शौर्य आणि गौरव हे नर चित्ते दणकट आहेत. ताज्या संघर्षात शौर्यने चांगलेच शौर्य गाजविले. प्रतिस्पर्धी गटाची मात्रा त्याने चालू दिली नाही. या संघर्षात हे दोन्ही नर चित्ते कोणतींही जखम न होता सुरक्षित राहिले आहेत्हृ ही समाधानाची बाब मानली जात आहे. तसेच दोन्ही कळपांमधींल एकाही चित्त्याचा मृत्यू झालेला नाही, यासंबंधीही वनरक्षकांनी संतोष व्यक्त केला.
चित्ते स्थिरावल्याचे संकेत
कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आता आफ्रिकेतून आणलेले हे चित्ते स्थिरावल्याचे या संघर्षातून दिसून येते, असे प्राणीतज्ञांचे मत आहे. अद्याप त्यांना संपूर्ण अभयारण्य मोकळे करुन देण्यात आलेले नाही. कारण या अभयारण्यातील अन्य प्राण्यांवर त्याचा काय परिणाम होईल हे स्पष्ट नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांना स्वातंत्र्य देण्यात येणार आहे. सध्या त्यांना एका मर्यादित भूमीत वनरक्षकांच्या दूरस्थ देखरेखीत ठेवण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली.
थरारक संघर्ष
ड चित्त्यांच्या दोन कळपांमधींल संघर्ष चित्तथरारक असल्याचे मत
ड सदर संघर्ष भूमीच्या स्वामित्वासाठी असण्याची शक्यता व्यक्त
ड फारसा रक्तपात किंवा जीवितहानी न होता तो झाला समाप्त









