महामानव आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरुन सध्या संसदेत जे काही घडत आहे, ते कोणालाही लाजेने मान खाली घालायला लावणारेच आहे. राजकीय पक्षांमधील स्पर्धा, मतांसाठीचे गळेकापू राजकारण आणि राजकारणात चालणाऱ्या इतर सर्व बऱ्यावाईट बाबी लक्षात घेतल्या तरीही इतकी खालची पातळी गाठली जाईल, अशी अपेक्षा नव्हती. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या राज्य घटनेवरील चर्चेला उत्तर देताना काही विधाने केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा अवमान वारंवार केला, यासंबंधीचे आरोप त्यांनी केले. त्यातील, 12 सेकंदांची एक व्हिडीओ क्लिप काँग्रेसने ‘एक्स’ या माध्यमावर पोस्ट केली आणि एक वाद निर्माण झाला. निर्माण झाला, म्हणण्यापेक्षा निर्माण करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य आहे. कारण, कोणत्याही भाषणाचा अर्थ लक्षात घेण्यासाठी ते संपूर्ण ऐकणे आवश्यक असते. निदान त्या भाषणातील ंसंबंधित मुद्द्याचा पूर्ण भाग तरी ऐकावा लागतो. तरंच, कोणत्या संदर्भात काय म्हटले गेले आहे, हे स्पष्ट होते. पण अलीकडच्या काळात सोशल मीडियावर एखाद्या भाषणातील किंवा वक्तव्यातील थोडासाच भाग कापून तो प्रसारित केला जातो. एकच पक्ष असे करतो असेही नाही. वास्तविक असे केल्याने फारसे काही साध्य होत नाही. कारण नंतर वस्तुस्थिती स्पष्ट होतेच. बुधवारचा संपूर्ण दिवस याच वादात संसदेचे कामकाज झाले नाही. मग गुरुवारी संसदेच्या ‘मकरद्वारा’त जे घडले, त्याचे पडसाद बरेच दिवस उमटत राहतील अशी शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांना ढकलले आणि त्यामुळे ते खासदार पडून जखमी झाले, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. प्रताप सारंगी या खासदारांच्या तर डोक्याला जखम झाली. त्यानंतर, हे खासदार आपल्याला संसदेत जाण्यापासून रोखत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपले गुडघे दुखावल्याचा आरोप केला. या सर्व प्रकाराचे व्हिडीओ चित्रण उपलब्ध असून ते पाहिले असता काय घडले आहे, हे प्रत्येकाला समजून येते. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या विरोधात संसद भवन पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. हा ढकलाढकलीचा आणि खासदार जखमी होण्याचा प्रकार संसदभवनाबाहेर घडला आहे. त्यामुळे या प्रसंगात ज्यांचा सहभाग आहे, त्यांच्यावर लोकसभेचे अध्यक्ष कारवाई करु शकतात, असे अनेक तज्ञांचे मत आहे. या प्रकरणात दोषी कोण, हे जर त्यांची चौकशी झाली तर स्पष्ट होईलच. या प्रकरणी व्हिडीओ फूटेज हे महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. त्यामुळे कालांतराने बऱ्याच बाबी स्पष्ट होतील. तथापि, ज्या महामानवाने भारताची घटना लिहिली, त्यांच्या नावाने हे असे प्रकार संसद परिसरात व्हावेत, हे खरोखरच निंदनीय आहे. या सर्व गदारोळात आणि गोंधळात कोणता पक्ष निर्दोष आणि कोणता दोषी हा मुद्दा सध्या बाजूला ठेवला, तरी आपल्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही सुजाण नागरिकाला आता देशाच्या भवितव्याविषयी चिंता वाटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आजकाल संसद ही कामकाज करण्यापेक्षा ते स्थगित करण्यासाठीच अधिक प्रसिद्ध होत आहे. गोंधळ, गदारोळ, घोषणाबाजी, अध्यक्षांच्या आसनाजवळ ‘वेल’मध्ये उतरणे, फलक धरणे, पत्रके फडकाविणे इत्यादी बाबी खूपच सौम्य वाटाव्यात असा हा गुरुवारचा प्रसंग आहे. संसदेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, तेव्हापासून सर्वांना तेथे काय चालते हे प्रत्यक्ष पाहता येऊ लागले आहे. आपल्याला सर्व लोक पहात आहेत, हे समजून संसदेतील गोंधळ कमी होईल आणि खासदार अधिक समंजसपणे वागतील, अशी अपेक्षा होती. पण उलटेच घडत आहे. संसदेतील आणि संसद परिसरातील गदारोळ अधिकच फोफावला आहे. आपले लोकप्रतिनिधी खासदार कसे आणि किती बेशिस्त आहेत, याचेच दर्शन वारंवार घडत आहे. वास्तविक, हे आपल्या घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने संसदेत जी चर्चा आयोजित केली गेली होती, ती गांभीर्याने आणि अभ्यासपूर्वक अशा प्रकारे होईल, अशी अपेक्षा होती. विरोधी पक्षांनी या चर्चासत्राची मागणी केली आणि सरकारने ती मान्य केली. पण एवढा एक सौहार्दाचा प्रसंग वगळता, लोकसभेत 2 दिवस आणि राज्यसभेत 2 दिवस अशा 4 दिवसांच्या चर्चेत केवळ परस्परांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप आणि प्रछन्न शब्दभडिमार यांचेच दर्शन घडले. सध्या निवडणुकांचा ‘सीझन’ नाही. तरीही अनेक खासदारांनी, विशेषत: विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचारी थाटाची भाषणे आणि आरोप केले. मग सत्ताधारी खासदारांनीही त्यांना त्याच भाषेत आणि तशाच पद्धतीने प्रत्युत्तरे दिली. त्यामुळे हे चर्चासत्र न ठरता धुळवडसत्र ठरले आहे. गुरुवारच्या प्रसंगाने तर या सगळ्यावरच कडी केली. असे घडणे हे आश्चर्यकारक अशासाठी की यामुळे मते मिळतात, हा राजकीय पक्षांचा समज मतदारांनी अनेकदा चुकीचा ठरविला आहे. हा ‘नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा खेळ कित्येकदा करणाऱ्याच्याच अंगलट येतो, हे देखील पुष्कळदा सिद्ध झाले आहे. कोण किती घटनाविरोधी आहे, हे कोणीही कितीदाही ओरडून सांगितले तरी मतदार ते अलीकडे फारसे मनावर घेत नाहीत, हे स्पष्ट होऊनही तेच केले जाते. यातून आपल्या राजकीय पक्षांचे, विशेषत: विरोधी पक्षांचे कल्पनादारिद्र्या तेव्हढे लोकांना दिसून येते. स्वत:जवळ कोणताही भरीव मुद्दा नाही, मात्र प्रसिद्धीच्या झोतात तर रहायचे आहे, अशी स्थिती असल्याने अशा सवंग पद्धतींचा उपयोग केला जातो. मतदार शहाणा आहे. तो आपल्या देखावाबाजीला भुलणार नाही, हे माहीत असूनही राजकीय पक्ष आपल्या सवयी सोडत नाहीत. यातून ते मतदारांना किती किंमत देतात हे देखील स्पष्ट होते. आपणच लोकशाहीचे आणि घटनेचे कसे तारणहार आहोत, असा आव आणणारे राजकीय पक्षच जेव्हा याच उदात्त संकल्पनांची अशी पायमल्ली, राजकीय स्वार्थासाठी करताना पहावे लागते, तेव्हा कोणत्याही सहृदय व्यक्तीस दु:ख होणे स्वाभाविक आहे. ही परिस्थिती कधीतरी सुधारेल, अशी आशा बाळगणे एवढेच सध्या सर्वसामान्यांच्या हाती आहे.
Previous Articleअति सर्वत्र वर्जयेत
Next Article खोबरेल हे खाद्यतेलच : सर्वोच्च न्यायालय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








