इचलकरंजी परिसरात बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश
इचलकरंजी : जनावरांच्या गोठ्यात सुरू असणारा उदगाव (ता. शिरोळ) येथील बनावट नोटा व्यवहार मध्ये आणण्याचा प्रकार जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने उघडकीस आणला. बुधवारी (ता.२९) मध्यरात्रीनंतर पथकाने याठिकाणी छापा टाकून ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच इचलकरंजी येथे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरात असणारे प्रिंटर व साहित्य साहित्य असे १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी साहिल रफिक मुल्लाणी (वय २६, रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार बाबूराव तोवार (वय २०, मूळगाव-इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ), रमेश संतराम पाटील (वय २९, रा.जुना चंदूर रोड, बरगे मळा इचलकरंजी) या तिघांना अटक केली आहे. जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान या उदगावसह शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक आण्णासाहेब जाधव यांना खबऱ्यामार्फत साहिल मुल्लाणी हा बनावट नोटा तयार करून जनावरांच्या गोठ्यामध्ये कट करून बाजारामध्ये चलनात आणत असल्याची माहिती मिळाली.
उदगाव येथील चिंचवाड मार्गावर हा प्रकार सुरू होता. ही माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली. बुधवारी मध्यरात्री पोलीस उपनिरीक्षक गिरीष शिंदे, हेड कॉ न्स्टबल संदीप भांडे, प्रकाश हंकारे, विशाल कांबळे यांच्या पथकाने उदगाव येथे चिंचवाड रोडवर असलेल्या जनावरांच्या गोठ्यात छापा टाकला.
यात साहिल मुल्लाणी याच्याकडून १०० रुपयांच्या ६८४ हुबेहुब दिसणाऱ्या ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा छापण्याबाबत कुठे प्रक्रिया झाली याबाबत पोलिसांनी माहिती घेतली. मुल्लाणी याच्याकडून माहिती घेतला असता नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य इचलकरंजी येथील बरगे मळा, बसवेश्वर नगर येथे रमेश पाटील याच्याकडे असल्याचे समजले.
त्यानुसार रमेश पाटील याच्याकडे असलेला १९ हजार रुपये किंमतीचा प्रिंटर, ६०० रुपये किंमतीचे पांढरे कागद व इतर साहित्य असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर यामध्ये असणाऱ्या आणखी एक संशयित ओंकार तोवार याला दानोळी येथून ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टबल प्रकाश नारायण हंकारे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करत आहेत. आरोपींना न्यायालयात उभे केल्यानंतर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा पाराज-पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान जयसिंगपूर आणि इचलकरंजी परिसरात याबाबतचे धागेदोरे सापडल्यामुळे खळबळ माजली आहे.








