वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये तीन युवकांनी शीख समुदायाच्या दोन वृद्धांवर वर्णद्वेषी हल्ला केला आहे. या युवकांनी शीख वृद्धांना रस्त्यांवर मारहाण केली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनच्या वॉल्वरहॅम्प्टन रेल्वेस्थानकानजीक ही घटना घडली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. परंतु तिन्ही युवकांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत विदेशमंत्री एस. जयशंकर यांना हे प्रकरण ब्रिटन सरकारसमोर उपस्थित करण्याची सूचना केली आहे. ब्रिटनमध्ये दोन वृद्ध शिखांवर झालेल्या या भयानक हल्ल्याची मी निंदा करतो. या घटनेदरम्यान एका शिखाची पगडी बळजबरीने उतरविण्यात आल्याचे सुखबीर बादल यांनी म्हटले आहे.
तर याप्रकरणी तपास करणाऱ्या ब्रिटनच्या पोलिसांनी अशाप्रकारच्या वर्तनाच्या विरोधात इशारा जारी केला आहे. अशाप्रकारचे वर्तन आम्ही सहन करणार नाही. आम्ही याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तिन्ही आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









