वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला अॅथलिट 30 वर्षीय रचना कुमारी उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्याने तिच्याव हंगामी स्वरूपी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अलिकडेच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रचना कुमारीने आपल्या सहभाग दर्शविला होता.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक फेडरेशनच्या इंटीग्रेटी युनिटतर्फे ही उत्तेजक चाचणी घेण्यात आली. उत्तेजक चाचणीवेळी तिच्या मूत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याचे सांगण्यात आले. 24 सप्टेंबर रोजी पतियाळा येथे घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीमध्ये रचना कुमारीचे मूत्रल नमुने घेण्यात आले होते. पण त्यानंतर आपल्याला या नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याची माहिती देण्यात आली नाही असेही रचना कुमारीने म्हटले आहे. रचना कुमारी ही उत्तरप्रदेशची रहिवासी असून तिने वृत्तसंस्थेशी संपर्क साधून आपले मनोगत व्यक्त केले. रचना कुमारीचे हे प्रकरण नाडा अंतर्गत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. रचना कुमारी उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यास तिच्यावर कमाल चार वर्षे बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हातोडाफेक प्रकारात रचना कुमारीने 58.13 मि. चे अंतर नोंदवित नववे स्थान मिळविले होते. तर गेल्या जूनमध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 65.03 मि. चे हातोडाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम आणि सुवर्णपदक घेतले होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला अद्याप एकही पदक मिळालेले नाही.









