वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरूद्ध विश्वचषकाचा उपांत्य फेरीतील सामना खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेल्या न्यूझीलंडचा नवीन ‘सेन्सेशन’ रचिन रवींद्र याला बुधवारी होणार असलेल्या सदर सामन्यात आपला संघ समपातळीवर राहील, असा विश्वास वाटत आहे.
रवींद्रने या विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करून दाखविताना आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत आणि सध्या तो दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या मागे सर्वाधिक धावा काढलेल्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मोठा इतिहास असलेल्या आणि संपूर्ण क्षमतेने भरलेल्या वानखेडेवरील प्रेक्षकांसमोर अपराजित राहिलेल्या भारताविरूद्ध खेळणे हे माझे स्वप्न होते. आम्ही समपातळीवर राहू आणि आम्ही आमच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करू, असे रवींद्रने न्यूझीलंड क्रिकेटशी बोलताना सांगितले आहे.
आम्हाला माहीत आहे की, आम्ही क्रिकेटचा प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, तुम्ही प्रत्येक सामना हरू शकता किंवा जिंकूही शकता. तेव्हा आम्ही हा सामना कसा आकार घेतो ते पाहू,, असे 23 वर्षीय रचिन रवींद्रने यावेळी सांगितले. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांतून 565 धावा केल्या आहेत. रवींद्रचे आजी-आजोबा बेंगळूरमध्ये राहतात आणि त्यांनी त्याला पाकिस्तानविरूद्ध शानदार शतक झळकावताना पाहिले होते. मात्र सदर सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडकडे नेहमीच महत्त्वाच्या प्रसंगांसाठी बड्या सामन्यांचा अनुभव असलेले अनेक अप्रतिम खेळाडू उपलब्ध असतात, याकडे त्याने लक्ष वेधले.
गेल्या दोन विश्वचषकांतील न्यूझीलंडच्या कामगिरीची चर्चा होत आहे. हे शिखर सामने राहिलेले आहेत. एमसीजीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध, लॉर्ड्सवर इंग्लंडविरूद्ध खेळल्यानंतर आता संघ वानखेडेवर भारताविरूद्ध खेळणार आहे. अशा प्रसंगी संघात या प्रकारचे बडे सामने खेळण्याचा अनुभव असलेले खेळाडू असणे हे खूप छान असते, असे रचिनने सांगितले. 2015 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात किवींना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते आणि 2019 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरूद्ध पुन्हा तशीच परिस्थिती त्यांच्या वाट्याला आली होती.
गेल्या काही विश्वचषक स्पर्धांत न्यूझीलंड संघ ज्या प्रकारे खेळलेला आहे आणि बाद फेरीत पोहोचून आता अंतिम फेरीत पोहोचण्याच्या उंबरठ्यावर ज्या प्रकारे ठेपलेला आहे त्याचा विचार करता हा एक खास क्षण आहे, असे तो पुढे म्हणाला. ‘मला वाटते लहानपणी सर्वांचे बाद फेरीतील मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचे स्वप्न असते आणि मी भारताविरूद्धच्या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे’, असे त्याने सांगितले.
रचिनसाठी बेंगळूर शहर हे खास राहिलेले आहे. कारण तेथे लोकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि जेव्हा जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तेव्हा त्याला उपस्थित प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळालेली आहे. ‘बेंगळूरला भेट देणे खूप खास राहिलेले आहे. लहानपणी येथे खूप वेळ घालवलेला आहे आणि काही चांगले सोबती बनवलेले आहेत. तेथे असताना कुटुंबियांशी संपर्क साधणे हा नेहमीच सुखद क्षण असतो आणि मला वाटते की, बेंगळूरमध्ये सामना खेळताना संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणे हे विशेष आहे, असेही रचिनने यावेळी सांगितले.









