वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसीतर्फे पुरुष आणि महिलांच्या क्रिकेट विभागात सर्वोत्तम कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिन्यामध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड केली जाते. 2023 च्या ऑक्टोबर महिन्यासाठी पुरुष विभागात न्यूझीलंडचा नवोदित स्टार क्रिकेटपटू रचिन रवींद्र तर महिलांच्या विभागात विंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूज यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने सातत्याने धावा जमवल्या आहेत. या स्पर्धेत त्याने 70.62 धावांच्या सरासरीने 565 धावा जमवल्या आहेत. त्याने अहमदाबादमध्ये झालेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडविरुद्ध नाबाद 123 धावांची खेळी केली होती. रचिन रवींद्रच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली होती. तसेच त्यानंतर रचिन रवींद्रने बलाढ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 116 धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत रचिनने नेदरलँड्स विरुद्ध 51 तर भारताविरुद्ध 75 धावा झळकवल्या होत्या. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 389 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात रचिनने 89 चेंडूत 116 धावांची खेळी केली होती पण न्यूझीलंडला हा सामना 5 धावांची गमवावा लागला होता. या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये रचिन रवींद्र, भारताचा जसप्रीत बुमराह आणि द. आफ्रिकेचा डी कॉक यांचा सहभाग होता पण रचिनने या दोन्ही क्रिकेटपटूंना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
महिलांच्या विभागात विंडीज महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिली मॅथ्यूज हिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हेली मॅथ्यूजने आयसीसीचा हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावला आहे. विद्यमान टी-20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत मॅथ्यूजने आपल्या फलंदाजी सातत्य राखताना तीन सामन्यात अनुक्रमे नाबाद 99, 132 आणि 79 धावांची खेळी केल्याने तिची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली होती. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 अष्टपैलूच्या मानांकन यादीत हेली मॅथ्यूज ही पहिल्या स्थानावर आहे. या पुरस्कारासाठी हेली मॅथ्यूज, बांगलादेशची नाहिदा अख्तर आणि न्यूझीलंडची अॅमेलिया केर यांच्यात शर्यत होती.









