‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ प्रकरणी तपास
वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची सोमवारी सीबीआयने कसून चौकशी केली. सोमवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक दाखल झाले होते. जवळपास पाच तास चौकशी केल्यानंतर दुपारच्या सुमारास अधिकारी निवासाबाहेर पडले. कारवाईनंतर प्रसारमाध्यमांनी सीबीआय अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
सीबीआयचे अधिकारी सोमवारी राबडीदेवींच्या निवासस्थानी दाखल झाले होते. सीबीआय पथक पोहोचले तेव्हा राबडीदेवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या. मात्र, चौकशीमुळे त्यांना घरीच थांबावे लागले. सदर पथक जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांच्यासह 14 जण आरोपी आहेत. या प्रकरणात संबंधितांना 15 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पूर्वनियोजनानुसार चौकशी
सीबीआय पथकाकडून चौकशीचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. या चौकशीसाठी सीबीआयने नोटीस पाठवली होती. सुऊवातीला ही चौकशी सीबीआय कार्यालयात होणार होती, मात्र नंतर चौकशीसाठी पथक राबडी यांच्या निवासस्थानी पोहोचले. सोमवारी सकाळी जवळपास दहा ते बारा अधिकारी 3 वाहनांतून राबडीदेवी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. यापूर्वी मागील वर्षी मे आणि ऑगस्टमध्ये लालू-राबडीदेवी यांची चौकशी झाली होती. हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील असून लालूप्रसाद कुटुंबाला जमीन भेट देण्याशी संबंधित आहे.
झडती किंवा छापा नाही
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासस्थानाची झडती घेण्यात आली नाही किंवा छापा टाकण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी सीबीआयने राबडीदेवी यांना समन्स बजावून सोमवार, 6 मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी चौकशीची तारीख निश्चित केली होती. सीबीआयने त्यांना बिहारमधील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. मात्र, राबडीदेवी यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत घरी चौकशीसाठी येण्यास सांगितले होते.
तेजस्वी-राबडीदेवींचे स्पष्टीकरण
सीबीआय चौकशीनंतर राबडीदेवी विधान परिषदेत पोहोचल्या. याप्रसंगी त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता सीबीआय अधिकारी बऱ्याचवेळा आमच्या ठिकाणी येऊन चौकशी करत असतात. हे सुऊवातीपासूनच होत आले आहे, असे स्पष्टीकरण दिले. या चौकशीप्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाष्य केले आहे. सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर अधिकारी दर महिन्याला येत असतात. ही प्रक्रिया 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. आम्हाला काही फरक पडला नाही. जेव्हा कोणी चूक करत नाही, तेव्हा घाबरण्याची आवश्यकता नसते, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
राजद समर्थकांची घोषणाबाजी
राबडीदेवींच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक आल्याची माहिती मिळताच त्यांच्या निवासाबाहेर पक्ष कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सीबीआयच्या चौकशीसत्रादरम्यान आरजेडी समर्थकांनी राबडी निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. समर्थकांची केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मोदी सरकार लालू-तेजस्वींना घाबरल्यामुळे सीबीआयची टीम इथे पाठवण्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे होते. लालू कुटुंबीयांना नाहक त्रास देण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी सीबीआयचे पथक येथे पाठवण्यात आल्याचे येथे उपस्थित एका राजद आमदाराने म्हटले आहे. तसेच गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत लालू आणि तेजस्वी कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाहीत. 2024 मध्ये जनता याचे चोख उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
विरोधकांची टीका
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या चौकशीप्रश्नी सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षाच्या लोकांवर छापे टाकणे योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये विरोध असेल तेथे त्यांना काम करू दिले जाणार नाही, असा टेंड सुरू आहे. ईडी, सीबीआय किंवा राज्यपालांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचे ते म्हणाले. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही जे विरोधी नेते भाजपसमोर झुकायला तयार नाहीत त्यांना ईडी-सीबीआयकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. भाजपला विरोधकांचा आवाज दाबायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.









