वृत्तसंस्था /पाटणा
राजद नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची पुन्हा एकदा बिहार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जेडीयू एमएलसी नीरज कुमार आणि रीणादेवी यांना सत्ताधारी पक्षाकडून व्हिप म्हणून नामांकन देण्यात आले आहे. विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्या परवानगीनंतर बिहार विधान परिषद सचिवालयाने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. बिहार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भाजपचे प्रा. राजेंद्र प्रसाद गुप्ता आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते लालन कुमार सराफ यांची सत्ताधारी पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जेडीयूचे नीरज कुमार आणि रीणादेवी यांना सत्ताधारी पक्षाचे व्हिप बनवण्यात आले आहे. त्याचवेळी भाजपचे संजय प्रकाश यांना सत्ताधारी पक्षाचे उपमुख्य व्हिप बनवण्यात आले आहे.









