कोल्हापूर / धीरज बरगे :
जिल्ह्यात एकूण 20 हजार 857 हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. हे प्रमाण 98.61 टक्के असून यामध्ये सर्वाधिक ज्वारीची 12 हजार 307 आणि हरभरा पिकाची 4259 हेक्टर पेरणी झाली आहे. गतहंगामाच्या तुलनेत या हंगामात रब्बीच्या पेरणीत काहीशी वाढ झाली आहे. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुका रब्बीच्या पेरणीमध्ये आघाडीवर आहे. पंधरा दिवसानंतर जिल्ह्dयात रब्बी पिकांच्या काढणीची धांदल सुरु होणार आहे.
जिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पंधरा दिवसांनी रब्बी पिकांच्या काढणीची धांदल सुरु होणार आहे. यंदा रब्बी पिकास पोषक वातावरण असल्याने पिके जोमात आहेत. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, मका, कडधान्य, तृणधान्य अशा पिकांची पेरणी केली होती. आता ही पिके काढणीला आली असून पिकांची वाढ चांगली असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
- गत हंगामाच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात वाढ
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्राधान्याने ऊस पिक घेतले जाते. सिंचन वाढेल पाण्याची उपलब्धता होत असल्याने ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. ऊसाचे क्षेत्र वाढत असले तरी यंदाच्या रब्बी हंगामात गत हंगामाच्या तुलनेत रब्बीच्या पेरणी क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. 2023-24 च्या हंगामात जिल्ह्यात 20731 हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा 2024-25 मध्ये 20857 हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
- जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला
रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी ज्वारी पिकाची झाली आहे. सरासरी 11854 हेक्टरवर ज्वारीची पेरणी होईल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात पेरणीमध्ये वाढ झाली असून 12307 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. गतहंगामात 11502 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. हातकणंगले तालुक्यात रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकाची पेरणी झाली असून 4259 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
- जिल्ह्यात ओल्या चाऱ्याचा तुटवडा
जिल्ह्यातील ऊस पिकाची तोडणी बहुतांश ठिकाणी मशिनद्वारे झाली आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. परिणामी पुढील काळात ओल्या चाऱ्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे ऊस तोडणीनंतर खोडव्यामध्ये मका, बाजरी अशी ओल्या चाऱ्याची उपलब्ध होणारी आंतरपिके घेतली जात आहे.
- जिल्ह्यातील रब्बी पेरणी : (आकडेवारी हेक्टरमध्ये)
पीक पेरणी क्षेत्र
ज्वारी 12307
गहू 1151
मका 1987
हरभरा 4259
कडधान्य 998
तृणधान्य 155
एकूण 20857
- रब्बीची तालुकानिहाय पेरणी :
तालुका पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
हातकणंगले 5615
पन्हाळा 1900
शाहूवाडी 1559
करवीर 1767
कागल 2932
गडहिंग्लज 4696
शिरोळ 971
राधानगरी 519
गगनबावडा 208
भुदरगड 228
चंदगड 242
आजरा 95








