वृत्तसंस्था/ आयसल ऑफ मॅन, यूके
फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी वर्चस्व जेतेपद पटकावले. महिला विभागात आर. वैशालीने तर खुल्या गटात विदित गुजराथीने हे यश मिळवित भारताला जागतिक स्तरावर दुर्मीळ दुहेरी मुकुट मिळवून दिला. या दोन्ही खेळाडूंनी कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
शेवटच्या व अकराव्या फेरीत वैशालीने मंगोलियाच्या बतखुयाग मुंगुतूलविरुद्धचा डाव अनिर्णीत राखत महिला विभागाचे विजेतेपद पटकावले. विदितने शेवटच्या सामन्यात सर्बियाच्या अॅलेक्झांडर प्रेडेकचा पराभव करीत या स्पर्धेतील सातवा विजय नोंदवून खुल्या विभागाचे जेतेपद पटकावले. वैशाली व विदित दोघांनीही प्रत्येकी 8.5 गुण मिळविले. ते जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिले. पुढील वर्षी एप्रिलमध्ये कॅनडात कँडिडेट्स स्पर्धा होत असून वैशालीला 25000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 20 लाख रु.) तर विदितला 80000 डॉलर्स (सुमारे 66 लाख रुपये) बक्षीस मिळाले.
महिला विभागात युक्रेनच्या अॅना मुझीच्युकला दुसरे स्थान मिळाले. शेवटच्या डावात तिने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगला बरोबरीत रोखले. तिसरे स्थान मिळविणारी चीनची टॅन झाँगयीदेखील कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. खुल्या विभागात हिकारु नाकामुराने भक्कम बचावाचे प्रदर्शन करीत अर्जुन इरिगेसीला बरोबरीत रोखले. अर्जुनला चौथे स्थान मिळाले. हॉलंडच्या अनिश गिरीने रशियाच्या आंद्रेय एसिपेन्कोचा 47 चालीत पराभव केला.









