वृत्तसंस्था/ आयसल ऑफ मॅन, यूके
ग्रँडमास्टर किताब पटकावण्याच्या मार्गावर असणाऱ्या भारताच्या आर. वैशालीने चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झाँगयी टॅनचा पराभव करून फिडे महिला ग्रां प्रि बुद्धिबळ स्पर्धेच्या दहाव्या फेरीअखेर अग्रस्थान पटकावले.
वैशाली व त्याचा आर. प्रज्ञानंद दोघांनीही कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्रता मिळविली असून असा पराक्रम करणारी ही पहिली बहीण-भावाची जोडी आहे. कँडिडेट्स स्पर्धा पुढील वर्षी कॅनडात होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्यासाठी दोघांचे प्रयत्न सुरू आहेत. वैशालीचे सध्या 2498 रेटिंग गुण झाले असून तिला ग्रँडमास्टर होण्यासाठी केवळ 2 रेटिंग गुणांची गरज आहे. ती ग्रँडमास्टर झाल्यास असा पराक्रम करणारी पहिली बहीण-भावाची जोडी ठरणार आहे .
येथे वैशाली 8 गुणांसह अग्रस्थानावर असून युक्रेनची अॅना मुझीचुक 7.5 गुणांसह दुसऱ्या तर मंगेलियाची बत्खुयाग मुंगुतूल 7 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. शेवटच्या फेरीत वैशालीच्या लढतीचा निकाल काहीही लागला तरी तिचे दुसरे स्थान निश्चित आहे. तानिया सचदेव व डी हरिका यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित एकूण 5.5 गुण मिळविले आहेत तर वंतिका अगरवाल व दिव्या देशमुख यांनीही विजय मिळवित 5 गुणांवर झेप घेतली.
खुल्या गटात ग्रँडमास्टर विदित गुजराथीने जबरदस्त फॉर्म कायम राखत रोमानियाच्या डीयाक बॉग्डन डॅनियलचा पराभव केला. त्याचा हा काळ्या मोहरांनी खेळताना मिळविलेला चौथा विजय आहे. हिकारु नाकामुरा, आंद्रेय एसिपेन्को यांच्यासह 7.5 गुण घेत संयुक्त आघाडीवर आहे. या स्पर्धेची एक फेरी बाकी आहे. अर्जुन इरिगेसीने सॅम्युअल सेव्हियनचा पराभव केला. अर्जुन संयुक्त चौथ्या स्थानी असून त्याची शेवटची लढत नाकामुराशी होणार आहे. अन्य एका सामन्यात प्रज्ञानंदला युक्रेनच्या अँटन कोरोबोव्हने बरोबरीत रोखले. पी. हरिकृष्ण, अरविंद चिदंबरम, एसएल नारायणन यांचे प्रत्येकी 5.5 गुण झाले आहेत.









