वृत्तसंस्था/ आयसल ऑफ मॅन, यूके
फिडे ग्रँड स्विस महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत भारताच्या आर. वैशालीने माजी महिला वर्ल्ड चॅम्पियन युक्रेनच्या मारिया म्युझीचुकचा भक्कम बचाव भेदून काढत शानदार विजय मिळविला आणि 3.5 गुणांसह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले.
या स्पर्धेच्या अद्याप सात फेऱ्या बाकी असून वैशाली चीनची टॅन झाँगयी व कझाकची असॉबायेव्हा बिबिसारा यांच्यासमवेत संयुक्त आघाडीवर आहे. अलीकडेच झालेल्या कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळविल्यानंतर वैशाली मोठ्या आव्हानसाठी सज्ज झाली आहे. तिने आक्रमक खेळातील कौशल्य दाखवत 23 चालीत एका सर्वोत्तम खेळाडूवर शानदार विजय साकार केला. चार डावातील तिचा हा तिसरा विजय आहे.
खुल्या विभागात ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसीला सर्बियाच्या अलेक्झांडर प्रीडेकने बरोबरीत रोखले तर ग्रँडमास्टर विदित गुजराथीने विजयी घोडदौड कायम ठेवत स्पेनच्या अॅलेक्सी शिरोव्हवर मात केली. उत्कृष्ट तांत्रिक खेळाचे प्रदर्शन करीत त्याने विजय मिळविला. रशियाचा ग्रँडमास्टर आंद्रेय एसिपेन्को सध्या फिडेचे प्रतिनिधित्व करीत असून त्याने फ्रान्सच्या माकांद्रिया मॉरिझीवर विजय मिळविले अग्रस्थान पटकावले. विदित व अर्जुन यांच्यासह एकूण 17 खेळाडू 3 गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. डी गुकेशला मात्र सलग चौथ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. सर्बियाच्या इव्हान सारिचने त्याला बरोबरीत रोखले. पी. हरिकृष्णने पहिला विजय नोंदवताना ब्रिटनच्या श्रेयस रॉयलवर मात केली. अन्य भारतीयांमध्ये निहाल सरिनने अर्मेनियाच्या सॅमवेल टेर सहाक्यानचा पराभव केला तर आर. प्रज्ञानंदला तुर्कीच्या मुस्तफा यिल्माझने बरोबरीत रोखले.
महिला विभागात डी हरिकाला पराभवाचा धक्का बसला मंगोलियाच्या बत्खुयात मुंगुनतूलने तिला हरविले तर इंडोनेशियाच्या ऑलिया मेदिना वेर्डाने तानिया सचदेववर विजय मिळविला. दिव्या देशमुख व पोलंडची ओलिविया किओलबासा यांचा डाव अनिर्णीत राहिला तर वंतिका अगरवालने पहिला विजय नोंदवताना चिलीच्या जवेरिया बेलेन गोमेझ बरेरावर विजय मिळविला.









