वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्वचषकातील रौप्यपदकाने आनंदित झालेल्या ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने हांगझाऊ येथे होणार असलेल्या आगामी आशियाई खेळांत भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रज्ञानंदचा शुक्रवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. भारताला आशियाई खेळांत सुवर्ण जिंकण्याची चांगली संधी’ असल्याचे मत या बुद्धिबळपटूने व्यक्त केले आहे.
नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेला प्रज्ञानंद हा आशियाई खेळांतील स्पर्धेत भाग घेणाऱ्या 10 सदस्यीय भारतीय संघाचा भाग आहे. प्रज्ञानंदच्या व्यतिरिक्त इतर भारतीय बुद्धिबळपटूंनीही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून मी खरोखर चांगली कामगिरी करत आलो आहे. त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. मला वाटते की, आम्हाला सुवर्ण जिंकण्याची खूप चांगली संधी आहे’, असे प्रज्ञानंदने सांगितले आहे. पीटीआयला सांगितले.
गेल्या आठवड्यात फिडे विश्वचषकातील सर्वांत तऊण रौप्यपदक विजेता ठरलेल्या या 18 वर्षीय ग्रँडमास्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर एका दिवसाने ठाकूर यांच्याकडून त्याचा सत्कार करण्यात आला. ‘प्रज्ञानंद लहान वयातच खूप परिपक्व झाला आहे. तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे. त्याच्या चाली खूप वेगवान असतात आणि त्याने ज्या प्रकारे मानसिक, शारीरिक तसेच बुद्धिबळ पटाच्या संदर्भात तयारी केली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे’, असे ठाकूर म्हणाले. ‘मला त्याचे अभिनंदन करायचे होते. 10 व्या वर्षी ‘इंटरनॅशनल मास्टर’ बनणे आणि मॅग्नस कार्लसनला 16 व्या वर्षी हरवणे ही एक मोठी उपलब्धी आहे. गेल्या काही वर्षांत त्याने खूप काही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. त्याच्या पालकांचीही यात मोठी भूमिका आहे’, असे ते पुढे म्हणाले.









