समिती उमेदवाराला निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
वार्ताहर /किणये
महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची सोमवारी कोंडसकोप्प-कोळीकोप्प भागात प्रचारफेरी काढण्यात आली. आर. एम. चौगुले यांना या भागातून पूर्णपणे पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. माय मराठीच्या रक्षणासाठी व समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार या परिसरातील कार्यकर्त्यांनी केला आहे. आर. एम. चौगुले यांना ग्रामीण भागाच्या विविध भागातून पाठिंबा वाढला आहे. यावेळी समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असल्यामुळे चौगुले यांच्या प्रचारफेरीत तरुणांसह महिलांची गर्दी होऊ लागली आहे. सोमवारी सकाळी कोंडसकोप्प गावातून प्रचारफेरीला सुरुवात झाली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आर. एम. चौगुले यांचे पुष्पहार व फेटा बांधून स्वागत केले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी व आपल्या सीमाप्रश्नाचा लढा सोडविण्यासाठी ग्रामीणमधून मला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन आर. एम. चौगुले यांनी केले. त्यानंतर खमकारट्टी गावात आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी काढण्यात आली. या गावातही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोळीकोप्प गावात महिलांनी चौगुले यांचे आरती ओवाळून स्वागत केले. आर. एम. चौगुले हे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी झटणारे नेतृत्व आहे. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांची सेवा करण्यासाठी त्यांना निवडून आणुया, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवाजी सुंठकर, मोनाप्पा पाटील, पुंडलिक कुडचीकर, अमर पाटील, मारुती बेळगावकर, यलाप्पा घंटानी, यलाप्पा रेमाणाचे, नारायण सावगांवकर, कांतेश चलवेटकर, मोनाप्पा संताजी, सागर बिळगोजी, महादेव सामजी, पुंडलिक घोरपडे, अरुण नाकोजी, संजु पोटे, परशराम लकपण्णावर, संतोष जाधव, महेश कोडचवाड आदी उपस्थित होते.









