वृत्तसंस्था/ चेन्नई
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या आणि कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळविलेल्या भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानदंचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन झाल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळावर राज्य क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
त्याच्या चाहत्यांनी एक्झिट गेटवर आतुरतेने वाट पाहत त्याला फुलांचा मुकुट, शाल आणि पुष्पगुच्छ दिले. तो बाहेर पडताच त्याच्या मार्गावर फुले उधळली गेली आणि कलाकारांनी याप्रसंगी तामिळनाडूचे लोकनृत्य करगट्टम आणि ओयलट्टम सादर केले. प्रज्ञानंद ज्या वाहनात चढला त्या वाहनाच्या दोन्ही बाजूला मीडियाचे प्रतिनिधी होते. त्याने वेळ काढून प्रतिक्रिया देताना येथे झालेल्या स्वागताने आपण खूप आनंदित झालो आहे, असे सांगितले. त्याने त्याला दिलेला राष्ट्रीय तिरंगा स्वीकारला आणि फडकविला.
प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी यांनीही तिच्या 18 वर्षांच्या मुलाचे ज्या प्रकारे भव्य स्वागत करण्यात आले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे फिडे विश्वचषक स्पर्धेतील स्वप्न नॉर्वेचा दिग्गज बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने संपुष्टात आणले. कार्लसनने ‘क्लासिकल’ लढती बरोबरीत सुटल्यानंतर अझरबैजानच्या बाकू येथे 24 ऑगस्ट रोजी झालेल्या टायब्रेकरमध्ये 1.5-0.5 फरकाने त्याचा पराभव केला.
अंतिम निकाल कसाही लागला, तरी प्रज्ञानंदच्या यशात 140 कोटी लोकांचे स्वप्न प्रतिबिंबित झाले आहे, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल आणि कँडिडेट्स स्पर्धेत प्रवेश मिळविल्याबद्दल त्यांनी प्रज्ञानंदचे अभिनंदन केले आहे. प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशाली ही देखील बुद्धिबळपटू असून ती दोन वेळा युवा बुद्धिबळ विजेती राहिलेली आहे.









