सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा माजी अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. 2009 साली अश्विनने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि शेवटही याच संघातून केला आहे. ‘आयपीएलचा माझा प्रवास समाप्त होत आहे. आता मी क्रीडा जगतातील नव्या प्रवासासाठी निघत आहे’, अशी पोस्ट करत सोशल मीडियावर करत त्याने आपला क्रिकेटमधील प्रवास थांबवला आहे.
आर. अश्विनने 2009 मध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळला. गेल्या हंगामात (आयपीएल 2025) तो चेन्नई संघात परतला, ज्यामध्ये खेळल्यानंतर त्याने आज क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. दरम्यान, आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करताना अश्विनने सोशल मीडियावर लिहिले की, प्रत्येक शेवटाची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा वेळ आज संपत आहे, परंतु वेगवेगळ्या लीगमध्ये खेळाचा एक्सप्लोरर आणि शोध घेणारा म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. आतापर्यंत मला जे काही दिले आहे त्याबद्दल बीसीसीआय आणि आयपीएलचे खूप आभार.
अश्विनची आयपीएलमधील कारकिर्द
अश्विनचा आयपीएल प्रवास 2009 मध्ये चेन्नईकडून सुरू झाला आणि शेवटही त्याने चेन्नई संघाकडूनच केला. आयपीएल 221 सामन्यात त्याने 187 बळी घेतले होते. चेन्नईकडून पदार्पण केलेल्या अश्विनने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज संघ अशा पाच संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या गाबा कसोटीनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.









