हिंदुत्ववादी संघटनांची मागणी ः पूजा करण्याची मागितली अनुमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुतुबमीनार परिसरातील कुव्वल-उल-इस्लाम मशिदीच्या ढांच्यामधील मूर्ती हटविण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. याचदरम्यान मंगळवारी कुतुबमीनार परिसरात हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जाणाऱया हिंदुत्ववादी संघटनेच्या अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुतुबमीनारमध्ये भगवान गणेशाच्या दोन मूर्ती उलटय़ा स्वरुपात असल्याने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मोठी नाराजी आहे. मशिदीतील मूर्ती पाहून लोकांच्या भावना दुखावत असल्याने त्या हटविण्यात याव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर कुतुबमीनारला विष्णू स्तंभ हे नाव देण्याची मागणी आहे.
मशिदीच्या ढांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व मूर्ती हटवून त्यांची प्रतिष्ठापना केली जावी आणि तेथे पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे. युनायटेड हिंदू प्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी अन्य हिंदुत्ववादी संघटनांसोबत मिळून मंगळवारी कुतुबमीनार परिसरात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. परंतु पोलिसांनी त्यांना असे करण्यापासून रोखले आहे.
ज्याला कुतुबमीनार म्हटले जातेय, तो प्रत्यक्षात विष्णू स्तंभ आहे. परंतु काही वेगळी विचारसरणी असणाऱया लोकांनी इतिहासाचे चुकीचे लेखन केले आहे. याला विष्णू स्तंभ घोषित करण्यात यावे अशी आमची मागणी असल्याचे गोयल म्हणाले. कुतुबमीनार परिसरातील कुव्वत-उल-इस्लाम मशिदीत मागील बाजूला भगवान गणेशाच्या दोन मूर्ती आहेत.









