अध्याय एकतिसावा
आपण वाचत असलेल्या एकादश स्कंधाचे वैशिष्ट्या म्हणजे श्रीकृष्णांनी स्वत: परमप्राप्ती होण्यासाठी ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती याबद्दल विवेचन केलेले आहे. या ग्रंथाची अवतरणिका म्हणजे गोषवारा देताना नाथमहाराज म्हणतात, पहिल्या पाच अध्यायात वैराग्य पूर्ण असे मुख्य अधिकाराचे लक्षण नारद वसुदेव यांच्या संवादातून सांगितले आहे. नंतर निमि आणि जयंत यांच्या संवादातून निर्भय कसा असतो, उत्तम भागवत कोण, मायातरण कर्म ब्रह्म कसे असते, इत्यादि नऊ प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगितली आहेत. पाचव्या अध्यायाच्या शेवटी सर्व देवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली की, आता अवतारसमाप्ती करून निजधामाला या. त्यावर माजलेल्या यादवांचा नि:पात करून मी निजधामाला येतो असे श्रीकृष्णांनी देवांना सांगितले. ते ऐकल्यावर मलाही तुमच्याबरोबर निजधामाला घेऊन चला असा उद्धवाने त्यांच्याकडे हट्ट धरला पण श्रीकृष्णाबरोबर निजधामाला जाण्यासाठी आवश्यक ती पात्रता अंगी येण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला अर्जुनाप्रमाणे सविस्तर उपदेश करण्याचे ठरवले. तो संपूर्ण कथाभाग येथून पुढील अध्यायात आपल्याला वाचायला मिळतो म्हणून भागवत महापुराणातल्या या एकादश स्कंधाला उद्धवगीता असेही म्हणतात. त्या उपदेशामध्ये भगवंतानी माणसाच्या मनात स्वत:विषयी निरनिराळ्या कल्पना असतात त्या सगळ्यांचे खंडन करून टाकले. काम आणि लोभाचे गुप्त खुंट परमार्थाची वाट अडवून धरतात म्हणून ते समूळ छेदून टाकले. क्रोधाचा जाड असा पीळ मनामध्ये पडलेला असतो त्यामुळे माणसाला शांती कशी ती मिळत नाही म्हणून तो त्यांनी समूळ उपटून टाकला. ज्याप्रमाणे तहानलेल्या चातक पक्षावर मेघातून पाणी पडले की, तो जसा शांत होतो त्याप्रमाणे उद्धव हा उपदेश करण्यासाठी अत्यंत उत्तम शिष्य आहे हे ओळखून भगवंतानी त्याच्यावर उपदेशाच्या कृपेचा वर्षाव केला. उद्धवाचे मनरूपी शेत त्यांनी ओले केले आणि तेथे निजबोधाचे म्हणजे तो खरा कोण आहे, हे सांगणारे पूर्णब्रह्माचे निजबीज पेरले. त्यानंतर त्यांनी उद्धवाला यदु अवधूतसंवाद वर्णन करून सांगितला. त्यामध्ये अवधुतांनी केलेल्या चोविस गुरुंची महती सांगितली. दहाव्या अध्यायामध्ये परमार्थाबद्दल निरनिराळे लोक वेगवेगळी मते मांडत असतात त्या सगळ्यामुळे उद्धवच्या मनात ज्या ज्या म्हणून शंका होत्या त्या त्या सर्व नाहीशा केल्या. अकराव्या अध्यायात मुक्तलक्षणे सांगितली. बाराव्या अध्यायात सत्संगती याच्याबद्दल सविस्तर सांगितले. विषयांची विषयावस्था साधकाला कशी बाधत नाही ते तेराव्या अध्यायात सांगितले. तसेच हंसगीताची निर्मिती कशी झाली हेही सांगितले. समाधी कशी साधायची हे चौदाव्या अध्यायात सांगितले. जसजशी साधकाची परमार्थात प्रगती होत जाते तसतसे ऋद्धिसिद्धी त्याला कशा त्रास देतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून साधकाने स्वत:ची अध्यात्मिक प्रगती कशी साध्य करून घ्यावी हे पंधराव्या अध्यायात कथन केले. सोळाव्या अध्यायात उद्धवाला भगवंतानी त्यांच्या विभूती सांगितल्या शेवटी म्हणाले, हे सर्व विश्व आणि त्यातील सर्व व्यक्ती, वस्तू या त्यांच्याच विभूती आहेत. सतराव्या आणि अठराव्या अध्यायात क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार, चारही वर्ण आणि आश्रम याबद्दल साद्यंत सांगितले. एकोणिसाव्या अध्यायात कोंडा बाजूला करून धान्य वेचावे त्याप्रमाणे सद्विचार कसे गोळा करावेत आणि त्याप्रमाणे आचरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्रिविधविभागाचे निरूपण विसाव्या अध्यायात केले. याप्रमाणे भगवंतानी उद्धवाला परमपवित्र असा उपदेश पहिल्या वीस अध्यायात केला. या पुढील अध्यायात माणसाच्या गुणदोषांचे चिंतन साधकाने केले की त्याचे नुकसान कसे होते ते सांगितले आहे.
क्रमश: