पुलाची शिरोली/ वार्ताहर
दोन शेळ्या कळपातून चुकल्या असल्याचे भासवून दिवसा ढवळ्या अज्ञातांकडून दहा शेळ्यांची चोरी . यामध्ये शेळीपालकाचे सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. स्कॉर्पिओ जीप मधून आलेल्या अज्ञात तिघा – चौघां चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांतच दहा शेळ्या स्कॉर्पिओत भरल्या आणि पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने पोबारा केला. ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास नागाव येथील चौगुले मळ्यात घडली. उलगाप्पा हणमंता अलकुंटे (वय ६५, रा. शिवनेरी कॉलनी, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, उलगाप्पा अलकुंटे हे नेहमीप्रमाणे चौगुले मळ्यात शेळ्या चारण्यासाठी सोडून उभे होते. दुपारी एकच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्या रस्त्याने चालत निघाली होती. चांगला पोषाक परिधान केलेल्या त्या व्यक्तीने हुलगाप्पा यांना दोन शेळ्या रस्ता चुकल्याने भरकटल्या असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या जवळची काठी माझ्याकडे द्या, मी इथे थांबून या शेळ्या राखण करतो, तुम्ही त्या भरकटलेल्या शेळ्या घेऊन या असे सांगितले. अनोळखी व्यक्ती परोपकारी वाटल्याने उलगाप्पा यांनी तात्काळ त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि काठी त्याला देऊन काही मिनिटांतच त्यांने सर्व शेळ्या चारचाकी गाडी स्कॉर्पिओत भरून पोबारा केला. या घटनेची माहिती उलगाप्पा यांनी आपल्या मुलाला दिली.
दरम्यान, कळपातनं चुकलेल्या शेळ्या आणण्यासाठी ते निघाले. त्यांनी पाठ फिरवताच नंबर प्लेट नसलेली एक स्कॉर्पिओ तेथे आली. त्यातून तिघेजण उतरले आणि शेळ्या घेऊन गेले. अशी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये स्काॅर्पिओ महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने गेल्याची माहिती समजते. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









