30 टक्के कमिशनचे आमिष : खात्यात रक्कमही जमा, मात्र रक्कम वाढताच खातेच होते बंद, सावधगिरी बाळगणे गरजेचे
बेळगाव : दुनिया झुकती हैं झुकानेवाला चाहिए अशी म्हण आहे. ही म्हण खरी ठरवत सायबर गुन्हेगार फिशिंगला लागले आहेत. त्यांनी टाकलेल्या गळाला अनेक मासे अलगदपणे लागू लागले आहेत. झटपट श्रीमंती व अधिकाधिक परतावा मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक जण या टोळीच्या कारवायांना फशी पडत आहेत. सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून सुरू केलेला फसवणुकीचा फंडा जोरात सुरू आहे. सावजांना ठकविण्यासाठी खास करून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. ऑनलाईन फसवणुकीसाठी आता टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपचा वापर सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत बेळगाव जिल्ह्यातील तीनहून अधिक सावजांना सायबर गुन्हेगारांनी ठकविले आहे. तब्बल पाऊण कोटी रुपये गमावलेले सावज आता पुढे काय करायचे या चिंतेने त्रस्त आहेत. सायबर क्राईम पोलीस स्थानकाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
व्हॉट्सअॅपप्रमाणेच टेलिग्राम ही एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असणाऱ्यांना हेरून त्यांची फसवणूक केली जात आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणेच टेलिग्रामवर एक ग्रुप सुरू केला जातो. यासाठीही सुंदर महिलांचे फोटो असलेले प्रोफाईल तयार केले जातात. ‘हॅलो सर’ पासून टेलिग्रामवर त्यांचा संवाद सुरू होतो. तुम्ही कोठे राहता? काय काम करता? तुमचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? आदींविषयी चर्चा झाल्यानंतर आमची एक कंपनी आहे. त्यात गुंतवणूक करा, मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे आमिष दाखविले जाते. हा सारा संवाद टेलिग्रामवरच चालतो. एकदा जर आमच्या कंपनीत ऑनलाईन गुंतवणूक केलात तर चोवीस तासात किमान 30 टक्के कमिशन मिळते. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला विश्वास नसेल तर थोडीशी रक्कम गुंतवा. परतावा मिळतो की नाही, ते बघा. नंतरच निर्णय घ्या, असे सांगत सावजाचा विश्वास संपादन केला जातो. त्यांनी तयार केलेल्या ग्रुपमध्ये त्यांचेच लोक अधिक असतात. रोज आपल्याला अमूक फायदा झाला, आपण कोट्याधीश झालो. आपली आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारली, अशा संदेशांचा मारा सुरू होतो. कोट्यावधीशांचे अभिनंदनही केले जाते. त्यामुळे सावजाचाही विश्वास वाढतो. फसवणूक टाळण्यासाठी सुरुवातीला 1 ते 5 हजारपर्यंत ऑनलाईन गुंतवणूक केली जाते. 24 तासांत त्यांना 30 टक्के नफाही मिळतो. त्यामुळे आता आपली फसवणूक होणार नाही, असा सावजाचा विश्वास बसतो. मात्र, खरेतर इथूनच त्याची फसवणूक सुरू होते.
गुंतवणुकीच्या नावे बनावट अॅप
गुंतवणुकीच्या नावे बनावट अॅप तयार केले जातात. त्या अॅपच्या माध्यमातून व्यवहार सुरू होतो. खासकरून नोकरदार व शिक्षितांनाच सायबर गुन्हेगार गळ टाकतात. एखाद्या अॅपची लिंक पाठविण्यात येते. इन्व्हेस्टमेंट सेशल 24×7 प्रॉफिट्स रिटर्न गॅरंटी असा उल्लेख असलेले लिंक एकदा सावजाच्या खात्यावर पडले की गुंतवणूक सुरू होते. यासाठीही वेगवेगळे पॅकेज जाहीर केलेले असतात. 20 टक्के, 40 टक्के, 60 टक्के व 80 टक्क्यांपर्यंत नफा देण्याचे सांगितले जाते. गुगल प्ले स्टोअरवर असे अॅप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अॅप डाऊनलोड केल्यानंतर बँक खात्यासंबंधीची माहिती विचारून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. सध्या सोन्याचे दर वाढते आहेत. सोने आणि पेट्रोलमध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला जातो. सावजाने किरकोळ रक्कम गुंतविल्यानंतर एक-दोन वेळा त्याला परतावा दिला जातो. विश्वास बसल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम वाढत जाते. ही रक्कम काही लाखांच्या घरात पोहोचल्यानंतर अॅप आणि टेलिग्राम व व्हॉट्सअॅपवरील ग्रुप डिलिट केला जातो.
तिघा जणांची फिर्याद
सोशल मीडियावरील ग्रुप बंद झाल्यानंतरच आपण फसलो गेलो, याची सावजाला खात्री पटते. त्यानंतर आम्ही कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, कोणाशी संपर्क साधायचा? हे सुद्धा कळत नाही. अशावेळेला सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली जाते. बेळगाव जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे गेल्या सहा महिन्यांत अशाप्रकारे फसवणूक झालेल्या तिघा जणांनी फिर्याद दिल्याची माहिती आहे. एका सावजाचे तर 64 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी गुंतवणुकीच्या नावाने हडपले आहेत. आणखी एकाचे 6 लाख रुपये तर तिसऱ्याचे 3 लाख रुपये हडप करण्यात आले आहेत.
राज्यात दरमहा पंधराशेहून अधिक प्रकरणे उघडकीस
ही स्थिती बेळगाव जिल्ह्यातील झाली. संपूर्ण राज्यात दरमहा पंधराशेहून अधिक प्रकरणे उघडकीस येत आहेत. काही वेळा दोन हजाराच्या घरात फशी पडलेल्यांची संख्या असते. अशा प्रकरणांचा तपास करण्याचे आव्हान सायबर क्राईम विभागासमोर उभे ठाकले आहे. अॅपवर आणि टेलिग्राम व व्हॉट्सअॅपवर सुरू करण्यात आलेल्या ग्रुपवरून सावजाच्या खात्यात मोठी रक्कम जमा झालेली दिसते. पण मृगजळाप्रमाणे त्याची गत होते. कारण खात्यात जमा झालेली रक्कम काढताच येत नाही. जर सावजाने आपल्या खात्यातील रक्कम उचलण्याचा प्रयत्न केला तर ग्रुप डिलिट करून त्याच्याशी संपर्कच तोडला जातो. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून फशी पडणाऱ्यांची संख्या वाढती आहे.
सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जनजागृती
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी अशी प्रकरणे टाळण्यासाठी कार्यरत आहेत. सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीविषयी सावध केले जाते. तरीही सायबर गुन्हेगारांनी टाकलेल्या गळाला सावज लागतात. अशा गुन्हेगारांच्या कारवायांपासून सावध राहिले तरच फसवणूक टाळता येणार आहे, असे सांगत जिल्हा पोलीसप्रमुखांनी सावधगिरीचे आवाहन केले आहे. तर सायबर क्राईम विभागाचे बी. आर.गड्डेकर यांनी झटपट श्रीमंती व आमिषाला बळी पडला तर फसवणूक ही निश्चित आहे. तेव्हा अशा गुन्हेगारांपासून अंतर राखण्याचा सल्ला त्यांनी दिला.









