आपल्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नसतात. काही प्रश्न हे उत्तर मिळण्यासाठी विचारलेलेच नसतात. तर काही प्रश्नांची उत्तरं मुळी अस्तित्त्वातच नसतात. काही प्रश्न हे उत्तरासहितच जन्माला आलेले असतात. तर काही प्रश्नांची उत्तरे अनेक असतात. त्यासाठी पर्यायही अनेक असतात. आता जर का कुणी असं विचारत असेल,
मार दिया जाये या छोड़ दिया जाये?
बोल तेरे साथ क्या सलूक किया जाये?
तर त्याची उत्तरं एकापेक्षा जास्त असणारच ना? आणि तो प्रश्न आनंद बक्षींसारख्या प्रतिभावान गीतकाराच्या लेखणीतून उमटला असेल, लतादीदींनी गायला असेल तर त्याच्या उत्तराची वाट कुणीही पाहीलच म्हणा! ‘मेरा गाँव मेरा देश’ मधलं हे प्रश्नगीत विनोद खन्ना आशा पारेख यांच्यावर चित्रित झालं आहे. आणि हा प्रश्न लाडिक आहे बरं का! आणि असे लाडिक आणि सूचक प्रश्न कशासाठी विचारले जातात? हा प्रश्न तुम्ही विचारू नये…रेखा राव, अशोक सराफ जोडीने धमाल आणलेलं असंच एक प्रश्नगीत आहे.
निशाणा तुला दिसला ना?
झिरमिर पाऊसधाराभिरभिर करि मदनाचा वाराये ना सजणा ये ना!निशाणा तुला दिसला ना?
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या गाजलेल्या चित्रपटामध्ये हा रोमँटिक प्रश्न सुरेल केला आहे तो अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर या तत्कालीन ग्रेट चित्रसंगीत गायकांनी! आणि याच जोडीचं अजून एक मस्त गाणं म्हणजे
हसणार कधी बोलणार कधी?
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी?
‘माझं घर माझा संसार’ मधल्या या गाण्यात अक्षरश: पन्नास प्रश्न विचारले गेले आहेत.
मोठ्या मोठ्या बाता बढायामारल्या कोणी कोणी कोणीबघूया ग करू या की
नाही म्हटलंय कोणी कोणी कोणी
मोठ्या मोठ्या बाता बढाया मारल्या कोणी
बघूया ग करू या की नाही म्हटलंय कोणी
हे नुसते प्रश्न नव्हेत तर चक्क भांडण करताना विचारलेले जाब आहेत हे पाहताना गंमतच वाटते. कसे कसे प्रश्न असतात ना!
तसेच काही प्रश्न अत्यंत करुण असतात. हताश मनाने आयुष्यातल्या प्रॉब्लेमसमोर हात टेकलेले असतात. शिवपूर्वकाल हा असाच एक भयानक काळ होता. सुलतानशाह्यांचे अनेक आघात सोसत मेलेल्या मनाने जगणाऱ्या लक्षुमीने विचारलेला असाच एक हताश प्रश्न आहे.
सरणार कधी रण प्रभु हेकुठवर साहू घाव शिरी?
लतादीदींचा सर्वोपरी स्वर या कवितेला लाभलाय आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज लिहून गेले आहेत. खरं तर ‘पावनखिंडीत’ नावाची ही मूळ कविता आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या तोंडी अखेरच्या वेळी असणारे हे शब्द! पण त्यांचा संदर्भ थेट शिवपूर्वकालातल्या हताश बायाबापड्यांच्या भावनेचं अचूक चित्र काढतो. अगदी अस्साच असलेला एक अतीव करुण प्रश्न आपल्याला सुरेश वाडकर विचारतात तो या गाण्यातून.
दयाघना, का तुटले चिमणे घरटे?
क्षणिक मोहापायी धारेला लागलेल्या एका कलाकाराचा हा नियतीला, परमेश्वराला विचारलेला एक हताश प्रश्न ऐकणाऱ्याला हलवून सोडतो. पूर्वा रागावर आधारित असलेल्या या गाण्याला असलेला शास्त्राrय संगीताचा बाज कमाल आहे. तसेच काही प्रश्न स्वत:लाच विचारलेले असतात. ‘कळत नकळत’ मधलं अश्विनी भावेवर चित्रित झालेलं अतिशय अप्रतिम प्रश्नगीत आहे! हे शांतपणे ऐकावं. मग कळतं की किती मोठा आकाशाएवढा प्रश्न सुधीर मोघेंनी मनाला विचारलाय. मानवी मन हे आजपर्यंत तसंच राहिलेलं सर्वात मोठं गूढ आहे. मनोव्यापार ही एक अत्यंत अजब आणि बेभरवशी गोष्ट आहे. आत्यंतिक चारित्र्यवान किंवा अतिशय सभ्य सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसांचीही एखादी विचित्र बाजू असू शकते. ती स्वीकारावी लागते. स्वत:कडे निकोप मोकळ्या दृष्टीने पहावं लागतं. शिक्के मारून चालत नाही. यासारख्या अनेक विषयांवर हे गीत म्हणजे अगदी अचूक भाष्य आहे! म्हणून तर त्याच्या शेवटीही एक प्रश्न आहे.
तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का?
आयुष्य म्हणजे प्रश्नांशिवाय दुसरं काय असतं?
काही प्रश्न म्हणजे विरहार्त असतात. प्रियकराच्या आठवणीने व्याकूळ झालेली प्रेयसी किंवा तिच्या आठवणीत बुडालेला प्रियकर अगदी पानाफुलांनाही प्रश्न विचारून स्वत:चं समाधान करून घेतात. अगदी नाहिशा झालेल्या सीतामाईला शोधणारे प्रभु राम विव्हळ होऊन लतावेलींनाच नव्हे तर दगडांनाही प्रश्न विचारत सुटतात.
उजाड आश्रम उरे काननीकोठे सीता जनकनंदिनी?काय भोगणे आता उरले?चार दिसांचे चरित्र सरलेहे दु:खाचे सागर भरलेयात जाउदे राम वाहुनी
आपल्या डोळ्यासमोर वृक्षपाषाणांना कवटाळून ‘हे सीते तू कुठे आहेस?’ असं कळवळून विचारणारे रामराया समोर उभे राहतात अगदी! सगळी कथा माहीत असतानाही घशाशी आवंढा येतो. आपल्याला गाणं एवढं का लागून जातं? हा प्रश्न पडतो. त्याच रामरायांचं मायावी शिर बनवून ते सीतामातेला दाखवण्यासाठी रावण पाठवतो तेव्हा शोकावेगाने जळणारी सीतामाता
काय ऐकते? काय पाहते? काय अवस्था ही?
रघुवरा बोलत का नाही?
असे हृदय पिळवटून टाकणारे प्रश्न विचारते. रामायण सर्व विरामचिन्हांसह जिवंत करावं तर ते गदिमा आणि बाबूजी या द्वयीनेच! प्रत्येक प्रश्न थेट काळजाला भिडतो.
किती सांगू मी सांगू कुणाला? आज आनंदीआनंद झाला.
पण त्यातही राधिका मात्र वेगळी आहे. ती शांतपणे एवढंच विचारते,
का रे ऐसी माया कान्हा लाविली मला?
क्षणभरी सोडुन दूर तुला राहिना कसा जीव पहा का रे सांग राजसा?
गोकुळ शून्यवत् करून जाणाऱ्या कृष्णाला एकदा तरी पाठी वळून पहायला लावेल असा हा प्रश्न म्हणजे भैरवी रागातलं नाट्यागीत आहे. कृष्ण गोकुळातून निघून गेला त्यादिवशीची रिक्त तिन्हीसांज जणु या गाण्यात उतरली आहे असं का कोण जाणे, पण वाटतं. त्याच्या प्रभावलयांची त्याच्या मधुर बोलांची, त्याहून मधुर बासरीची सवय असणारं, त्याने भरून गेलेलं ते गोकुळ त्या रात्री कसं झोपलं असेल? कायमचा
निरोप घेऊन दूर जाणाऱ्याचं रिकामं घरटं दुसऱ्या दिवशी कसं जागं होतं ते पहाणं सर्वात जास्त वेदनादायक असतं का? प्रश्न म्हणजे याच रिक्त जागांचे उसासे असतात का? मला सांगेल का कुणी?
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








