स्वेच्छा निवृत्ती नको, कामगारांना कायम काम देण्याची कामगार नेते फोन्सेका यांची मागणी : 10 जुलैला कृषी संचालक, प्रशासकांसमवेत बैठक,,मुख्यमंत्री भेट घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा कामगार नेत्यांचा आरोप
पणजी : राज्यात एकमेव असलेला संजीवनी साखर कारखाना संपविण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. त्यामुळेच गेली 20 वर्षे कारखान्यासाठी योगदान दिलेल्या कामगारांवर संकट कोसळलेले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न करूनही ते ही भेट घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. संजीवनीच्या सर्व कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांना स्वेच्छा निवृत्ती न देता कायम कायम द्यावे, या मागणीसाठी कृषीमंत्री रवी नाईक यांची भेट घेतली असून, त्यांनी या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले, कृषी मंत्री रवी नाईक यांच्यासमोर संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांची व्यथा मांडण्यात आली असून, त्यांनी यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या 10 जुलै रोजी कृषी खात्याचे संचालक नेवल आल्फान्सो, प्रशासक सतेज कामत यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचेही फोन्सेका म्हणाले.
फोन्सेका यांनी सांगितले की, संजीवनी साखर कारखान्यात सुमारे 180 कामगार काम करतात. त्यापैकी 80 कामगार हे कंत्राट पद्धतीवर काम करीत असले तरी त्यांनी आपल्या आयुष्याची 20 वर्षे खर्ची घातली आहेत. दरवर्षी त्यांना कंत्राट पद्धतीवर ऊजू करण्यात येत होते. मग आत्ताच त्यांना कामापासून का वंचित ठेवले जात आहे. अगदी 12 ते 15 हजार ऊपयांवर हे कामगार काम करत आहेत. आज त्यांचे वय झाल्याने त्यांना अन्यत्र काम मिळणे कठीण आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना कायम कामावर घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. संजीवनी साखर कारखान्यातील कामगार हे कारखाना परिसरात शेती करणे, तिचा सांभाळ करणे, सुरक्षा रक्षक म्हणून जबाबदारीही पार पाडत आहेत. जे नियमित (फिक्स) पद्धतीवर काम करणारे कर्मचारी आहेत, तेही पडेल ते काम करण्यास तत्पर आहेत. संजीवनी साखर कारखाना आपलाच मानून ते एक कुटूंब कसे झटतात. तरीही या सर्व कामगारांचे सरकारला काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप कामगार नेते फोन्सेका यांनी केला.
मुख्यमंत्री जनतेचे नव्हे, केवळ कार्यकर्त्यांचे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सामान्य नागरिकांना भेटण्यास कधीच तयार नसतात. त्यांच्या कार्यालयात अनेकदा वेळ मागून घेऊनही त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केली आहे. कामगारांचा प्रश्न ऐकून घेण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वेळ न मिळणे हे आश्चर्यजनक आहे. मुख्यमंत्री सावंत हे केवळ आपल्या बगलबच्चे असलेल्या कार्यकर्त्यांना भेटतात. त्यामुळे प्रमोद सावंत हे जनतेचे नव्हे, केवळ कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री आहेत, असा गंभीर आरोप ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला.









