ममता बॅनर्जी यांच्याकडून नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षांचे नेते झाल्यास नरेंद्र मोदींना कुणीच पराभूत करू शकत नाहीत. पंतप्रधान मोदींसाठी राहुल गांधी हे टीआरपीप्रमाणे आहेत असे ममतादीदींनी मुर्शिदाबादमधील कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित करताना म्हटले आहे.
सागरदिघी पोटनिवडणुकीतील तृणमूल काँग्रेसच्या पराभवावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर ममतादीदींनी निशाणा साधला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी पोटनिवडणुकीदरम्यान संघ-माकपसोबत नियोजन केले होते. अधीर हे एकप्रकारे भाजपचेच नेते आहेत असा आरोप ममतादीदींनी केला आहे.
भाजपने राहुल गांधी यांना विरोधी पक्षांचे नेतृत्व मिळावे म्हणून संसदेत गदारोळ घडवून आणला. राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचा चेहरे व्हावेत अशी भाजपची इच्छा आहे. याचमुळे राहुल गांधी यांच्या विदेशातील वक्तव्यावरून संसदेत गदारोळ घडवून आणला जात आहे. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, अदानी मुद्दय़ावर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. सीएए, एनआरसी, समान नागरिक संहिता विधेयकाला आम्ही विरोध केला आहे. अल्पसंख्याक समुदाय आमच्यासोबत सुरक्षित असल्याचा दावा ममतादीदींनी केला आहे.
काँग्रेसपासून अंतर राखण्याचे धोरण
अलिकडच्या काळात तृणमूल काँग्रेसकडून राहुल गांधी यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस आता काँग्रेसपासून अंतर राखत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ओ. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यावद यांची भेट घेतली होती. या भेटीत नव्या राजकीय आघाडीवरून सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल यांच्यामुळे भाजपलाच मदत
राहुल गांधी हेच विरोधी पक्षाचे मुख्य चेहरे असावेत अशी भाजपची इच्छा आहे. राहुल यांच्याशी थेट स्पर्धा झाल्यास भाजपलाच लाभ होणार आहे. भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर राखण्याच्या योजनेवर आम्ही अन्य पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. काँग्रेस हा विरोधी पक्षांचा बॉस असल्याचा एक भ्रम असल्याचे तृणमूल काँग्रेसकडून म्हटले गेले आहे.









