पक्ष प्रवक्त्याकडूनच आक्षेप : केरळ प्रदेशाध्यक्षाकडून प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस पक्षाने 8 मार्च रोजी 39 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले होते .यात केरळमधील 16 उमेदवारांची नावे सामील होती. पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी आता या उमेदवार निवडप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केरळमध्ये केवळ एका महिलेलाच उमेदवारी का देण्यात आली अशी विचारणा शमा यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षानेच संसदेत सर्वप्रथम महिला आरक्षण विधेयक सादर केले होते. तरीही आमच्या पक्षाच्या केरळमधील उमेदवारांच्या यादीत केवळ एका महिलेचे नाव आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 2 महिलांना उमेदवारी दिली होती असे शमा यांनी म्हटले आहे.
शमा मोहम्मद यांची पक्षात कुठलीच मोठी पात्रता नाही. तसेच त्या पक्षात देखील नाहीत. शमा या केवळ टीव्ही वाहिन्यांवर काँग्रेसची बाजू मांडतात असा दावा केरळ काँग्रेस अध्यक्ष के. सुधाकरन यांनी केला आहे. तर काँग्रेस महिला आरक्षण विधेयकावरून कधीच गंभीर नव्हता अशी टीका भाजपने केली आहे. भाजपने केरळमध्ये 3 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर डाव्या आघाडीने 2 महिलांना लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.
अन्य पक्षांकडे वळतात महिलांची मते
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून अलाथुर मतदारसंघात राम्या हरिदास यांना उमेदवारी मिळाली आहे. अलाथुर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महिलांची मते मिळविण्यासाठी त्यांना अधिक संख्येत प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, सध्या महिलांची मते अन्य पक्षांकडे वळत आहेत. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही राजकारणात महिलांची हिस्सेदारी वाढवावी लागणार असल्याचे अनेकदा म्हटले आहे. पुढील 10 वर्षांमध्ये देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुख्यमंत्री महिला असाव्यात अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. केरळमधील काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका मान्य करावी इतकीच माझी इच्छा असल्याचे शमा यांनी म्हटले आहे.









