मारिहाळ पोलिसांची कारवाई : दोन मोटारसायकलीही जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
पिग्मी कलेक्टरला मारहाण करून त्याच्याजवळील पैशांची बॅग पळविल्याच्या आरोपावरून मारिहाळ पोलिसांनी चौघाजणांना अटक केली आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून दहा हजार रुपये रोकड, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 22 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास होनियाळजवळ माविनकट्टी रोडवर ही घटना घडली होती. मोदगा प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ्चे पिग्मी कलेक्टर उमेश बाळाप्पा पाटील हे माविनकट्टी येथील पिग्मी गोळा करून मोटारसायकलवरून होनियाळकडे जात होते. होनियाळ गावाजवळच त्यांना अडवून त्यांच्याजवळील 40 हजार रुपये रोख रक्कम व 5 हजार रुपयांची पिग्मी मशीन असलेली बॅग पळविण्यात आली होती.
याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी चारजणांना अटक केली आहे.
नागाप्पा ऊर्फ नागराज परसाप्पा नायक ऊर्फ बुडरी (वय 24) रा. होनियाळ, नागेंद्र अप्पय्या केरली (वय 27) रा. कबलापूर, लक्ष्मण ऊर्फ लक्काप्पा आप्पय्या तिरगुगोळ (वय 19), रा. कबलापूर, प्रकाश सोमशेखर ऊर्फ सोमप्पा पाटील (वय 23) रा. नागेरहाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकली व दहा हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









