डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन : ‘मिशा बजाज’ शोरुमचे थाटात उद्घाटन
बेळगाव : माणिकबाग ग्रुपकडून ग्राहकांना चांगली सेवा देण्यात येते. त्यामुळे समाजात माणिकबागविषयी एक वेगळा विश्वास निर्माण झाला असून या ग्रुपचे नावदेखील चांगले आहे. माणिकबाग ग्रुपचे नवे बजाज शोरुम ‘मिशा बजाज’ या नावाने सुरू झाले आहे. ‘हमारा बजाज’ असे बजाजचे स्लोगन आहे. मिरजी आणि शहा कुटुंबीयांची पाचवी पिढी एकत्रितरित्या या व्यवसायात कायम आहे. पुढील दहा पिढ्यांतदेखील अशीच एकी राहो, अशा शुभेच्छा केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिल्या.
मिरजी आणि शहा असोसिएटच्या माध्यमातून माणिकबाग ग्रुपचे नवे बजाज शोरुम मिशा बजाज नावाने सुरू करण्यात आले आहे. या नवीन शोरुमचा उद्घाटन समारंभ बुधवारी जे. पी. टॉवर्स, जुना धारवाड रोड, सुभाषनगर येथे पार पडला. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे आणि बजाज सर्कल हेड चार्ल्स एम. व्ही. यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. प्रभाकर कोरे आणि बजाज कंपनीचे सर्कल हेड चार्ल्स एम. व्ही. यांनी माणिकबाग ग्रुपला शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून माणिकबाग ग्रुपशी आपले घनिष्ठ संबंध आहेत. शहा आणि मिरजी यांची पाचवी पिढी एकत्रितरित्या व्यवसाय करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. पुढील दहा पिढ्या ही एकी अशीच राहावी, तसेच त्यांनी नव्या शोरुमच्या उद्घाटनाबद्दल शुभेच्छा दिल्या. बजाज कंपनीचे सर्कल हेड चार्ल्स एम. व्ही. यांनीदेखील माणिकबाग ग्रुप आपल्या सोबत आहेत याचा आम्हाला आनंद असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर माणिकबागचे संचालक भूषण मिरजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालक स्वप्निल शहा यांनी आभार मानले. शोरुमच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वाहने खरेदी केलेल्या पाच ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संचालक शील मिरजी, पार्टनर सौरभ शहा, मार्केटिंग विभागाचे जनरल मॅनेजर शैलेश खटावकर यांच्यासह इतर उपस्थित होते.









