अथर्व करडी मालिकावीर, योग शहा सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
आंनद क्रिकेट अकादमी आयोजित चौगुले चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात केएलईने सेंट पॉल्सचा 6 गड्यांने पराभव करून चौगुले चषक पटकाविला. मालिकावीर-अथर्व करडी (सेंट पॉल्स), योग शहा (केएलई) यांना सामनावीर देऊन गौरविण्यात आले.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सेंट पॉल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 92 धावा केल्या. त्यात सोमेश चौगुलेने 5 चौकारांसह 39 तर समर्थ करडीने 3 चौकारांसह 36 धावा केल्या. केएलईतर्फे कलश बेन्नकट्टीने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई इंटरनॅशनलने 14.4 षटकात 4 गडी बाद 95 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात योग शहाने 2 चौकारांसह 34, अथर्व भोगणने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. सेंट पॉल्सतर्फे अथर्व करडी व समर्थ करडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उमेश चौगुले, युवेना फर्नांडीस, प्रशांत रामगौडा, आनंद करडी यांच्या हस्ते विजेत्या केएलई व उपविजेत्या सेंट पॉल्स संघांना चषक, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर योग शहा (केएलई), उत्कृष्ट फलंदाज मोहम्मद हमजा (केएलई), उत्कृष्ट गोलंदाज साईराज सक्री (सेंट पॉल्स), मालिकावीर अथर्व करडी (सेंट पॉल्स) यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









