भारतावर कुणीच स्वत:ची मर्जी लादू शकत नाही : भारत जगाच्या विकासात भागीदार होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
क्वाड जगाला 5 संदेश देतो, यात सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आजच्या काळात कुणीच आमच्या मर्जीवर आणि आमच्या इच्छेवर नकाराधिकार वापरू शत नाही. जागतिक स्तरावर क्वाड दीर्घकाळापर्यंत राहणार आहे. ही संघटना सातत्याने वाढत जाणार असून जागतिक विकासात स्वत:चे योगदान देणार असल्याचे उद्गार विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीतील रायसीना डायलॉगच्या एका कार्यक्रमात बोलताना काढले आहेत. हिंद-प्रशांतशी निगडित प्रत्येक पुढाकाराच्या केंद्रस्थानी आसियानच आहे. शीतयुद्धानंतरच्या मानसिकतेला क्वाड चालना देतो. काही देशांच्या एकतर्फी दबदब्याच्या विरोधात क्वाड असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
क्वाड मुक्त, खुल्या आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या हिंद-प्रशांतला चालना देतो. चार देशांचा हा समूह एक बहुध्रूवीय व्यवस्थेच्या विकासाचा पुरावा आहे. लोकशाही आणि सहकार्याने काम करण्याच्या भावनेला बळ देणारी ही संघटना असल्याचे जयशंकर म्हणाले.
धमकाविले जाऊ शकत नाही!
या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या विदेशमंत्री पेनी वोंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाल्या. कवड एक अशा क्षेत्रासाठी उभे राहिले आहे, जेथे कुणालाच घाबरविले-धमकाविले जाऊ शकत नाही. येथे प्रत्येक वाद आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत सोडविला जात असल्याचे वोंग म्हणाल्या. जग सध्या मोठ्या बदलाच्या आणि विभागणीच्या काळाला सामोरे जात आहे. अशा स्थितीत मुक्त आणि खुल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. क्वाड या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे जपानचे विदेशमंत्री योको कामीकावा यांनी नमूद केले आहे. क्वाड 2024 ची बैठक नवी दिल्लीत होणार असली तरीही अद्याप याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतासाठी क्वाड आवश्यक
क्वाड रणनीतिक स्वरुपात चीनच्या आर्थिक आणि सैन्यशक्तीला प्रत्युत्तर देणारा समूह मानला जातो. याचमुळे हा समूह भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. चीन अन् भारतादरम्यान मागील काही काळापासून तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत चीनच्या आक्रमकतेत भर पडल्यास या कम्युनिस्ट देशाला रोखण्यासाठी भारत क्वाडच्या अन्य सदस्यांची मदत मिळवू शकतो. तसेच क्वाडद्वारे भारत चिनी अरेरावीला रोखून आशियात शक्तिसंतुलन साधू शकतो.









