कबरस्तानातील वातावरण नेहमीच गंभीर, रहस्यमय आणि काहीसे भीतीदायक असते, असा अनुभव आहे. तेथील घडामोडीही इतरत्र घडत नाहीत, अशाच असतात. त्यामुळे कबरस्तानांसंबंधी अनेक अफवा, दंतकथा आणि भयकथांची निर्मिती होत असते. अशा कथांमुळे आधीच गूढत्वाच्या भावनेने प्रभावित असणारी ही स्थाने अधिकच रहस्यमय होतात. तेथे जाण्यास अनेकांना भय वाटते. तर इतर काहीजण तेथे अशाच कथांमुळे जाण्यास उद्युक्तही होत असतात, असे दिसून येते.
कबरस्तानात पुरलेल्या मृतदेहांचे कालांतराने नैसर्गिक विघटन होते. मृतदेहांच्या हाडांमधील फॉस्फरस हे द्रव्य वाफेच्या स्वरुपात हवेत पसरते आणि या द्रव्यामुळे या स्थानी अनेक चित्रविचित्र आकृत्या किंवा दृष्ये निर्माण झाली आहेत, असा भास निर्माण होतो. अशाच आकृत्या ही भुते आहेत, अशी समजूत करुन घेतली जाते. त्यामुळे कबरस्तानात भुते असतात, असा समज रुढ होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ही भुतेखेते मग इतर अनेक दंतकथांना जन्म देत असतात.
जर्मनीच्या म्युनिच शहरातील एका कबरस्तानातील थडग्यांवर अचानक क्यूआर कोड दिसू लागल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले आणि लोकांच्या मनात आश्चर्य आणि भीती यांनी ठाण मांडले. असे क्यूआर कोड या कबरस्तानातील अनेक थडग्यांवर दिसू लागले आहेत, अशाही वार्ता लोकांमध्ये पसरल्या. त्यामुळे अनेक लोकांनी कबरस्तानाकडे धाव घेतली. तेव्हा खरोखरच त्यांना जवळपास प्रत्येक थडग्यावर आणि तेथे असलेल्या लाकडी शवपेटिकांवरही असे क्यूआर कोड असलेली स्टीकर्स आढळून आली. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या कबरस्तानाच्या आसपास फिरणाऱ्या लोकांनी कोणालाही ही स्टीकर्स थडग्यांवर लावताना पाहिले नव्हते. मग ती आली कोठून हा प्रश्न लोकांना पडला. प्रशासनाकडे याची तक्रार सादर करण्यात आली. सध्या या अजब प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. केवळ याच कबरस्तानात नव्हे, तर या शहरातील आणखी 2 कबरस्तानांमध्येही हा प्रकार झाल्याचे आढळून आले. हे क्यूआर कोड डाऊनलोड केल्यास थडग्यात ज्या व्यक्तीचा मृतदेह पुरला आहे, त्या व्यक्तीची नाव आणि इतर माहिती मिळते. त्यामुळे तर लोक अधिकच थक्क झाले आहेत. आता प्रशासनाने देखरेख वाढविली आहे. रात्री या कबरस्तानांमध्ये कोणी जाताना कोणाला आढल्यास प्रशासनाला कळविण्याची सूचना करण्यात आली आहे. हा कोणाचा खोडसाळपणा आहे की काय आहे, हे अद्याप समजलेले नाही. पण काही जणांच्या मते हा एक अद्भूत चमत्कारच आहे. हे गूढ आता सखोल चौकशीनंतरच उलगडू शकेल, अशी चर्चा असून प्रशासनही सैरभैर झाले आहे.









